‘मालती-माधव’मध्ये बहरला पुलंचा स्मृतिगंध...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 01:54 AM2018-11-10T01:54:37+5:302018-11-10T01:54:51+5:30
साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, चित्रकला, शिल्पकला, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मांदियाळीत ’मालती-माधव’ अपार्टमेंट या पुलंच्या निवासस्थानी लाडक्या पुलंचा जन्मदिन सोहळा रंगला.
पुणे - साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, चित्रकला, शिल्पकला, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मांदियाळीत ’मालती-माधव’ अपार्टमेंट या पुलंच्या निवासस्थानी लाडक्या पुलंचा जन्मदिन सोहळा रंगला. संपूर्ण आसमंत पुलंच्या स्मृतिगंधाने बहरून गेला.
महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष गुरुवारपासून (८ नोव्हेंबर) सुरू झाले. त्यानिमित्ताने पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकतर्फे आयोजित ‘ग्लोबल पुलोत्सवा’चा भाग म्हणून सकाळी पुलंच्या निवासस्थानी गुणिजनांचा मेळा भरला होता. दिवाळीतील पाडव्याचा दिवस असतानाही अनेकांनी आपल्या लाडक्या पुलंच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या स्मृती जागविल्या. भांडारकर रस्त्यावरील मालती-माधव अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारापाशी महापालिकेने जन्मशताब्दी वर्षाची माहिती देण्यासाठी उभारलेल्या नीलफलकाचे अनावरण महापौर मुक्ता टिळक, नाट्य संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार आणि साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. पुलंचे भाचे दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर यांनी सर्वांचे प्रेमाने स्वागत केले.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, प्रसिद्ध गायक पं. सत्यशील देशपांडे, संजीव अभ्यंकर, भुवनेश कोमकली, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट, मंगला गोडबोले, रेखा इनामदार-साने, मुकुंद टाकसाळे, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संचालक रवींद्र वंजारवडकर, सांस्कृतिक संचालनालयाचे मिलिंद लेले, अर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर, प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित, अभिनेता अजय पूरकर, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर या वेळी उपस्थित होते.
निखळ आनंदाने आणि माणुसकीने जीवनाकडे कसे पाहावे, हे शिकविणाऱ्या पुलंचे माझ्यासह अनेकांवर अनंत उपकार आहेत, अशी भावना प्रभावळकर यांनी व्यक्त केली. ’तुझे आहे तुजपाशी’, ‘एक झुंज वाºयाशी’ या पुलंनी लिहिलेल्या नाटकांतून आणि ‘एक होता विदूषक’ चित्रपटामध्ये मी काम केले. ‘तुझे आहे तुजपाशी’च्या तालमींना ते हजर असायचे, असे त्यांनी सांगितले. मुक्तांगण संस्थेतील मुलांनी पुलंच्या निवासस्थानी आकाशकंदील लावून जन्मशताब्दीचे आणि दिवाळीचे स्वागत केले.