नवी पेठेत भररस्त्यावर तरुणीचा विनयभंग, हॉटेलमधील कर्मचाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 09:19 AM2020-02-13T09:19:54+5:302020-02-13T09:20:01+5:30
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना आता पुण्यासारख्या शहरात तरुणींना रस्त्यावरून फिरणेही अवघड होऊ लागले आहे.
पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना आता पुण्यासारख्या शहरात तरुणींना रस्त्यावरून फिरणेही अवघड होऊ लागले आहे. क्लासला जाणाऱ्या तरुणींकडे पाहून अश्लिल हावभाव करण्याच्या दोन घटना सदाशिव पेठेत गेल्या आठवड्यात घडल्या होत्या. आता कामावरुन घरी जात असलेल्या तरुणीला पकडून भर रस्त्यात तिचा विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका हॉटेल कर्मचाऱ्यास अटक केली आहे.
राज घनशाम बहादूर थापा (रा. साई शिवनेरी हॉटेल, विठ्ठल मंदिराजवळ, सदाशिव पेठ) असे त्याचे नाव आहे.याप्रकरणी नवी पेठेत राहणाऱ्या एका २१ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना नवी पेठेतील श्रीराम मेडिकल जवळ बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली होती.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, राज थापा हा मुळचा नेपाळचा आहे. ही तरुणी बुधवारी रात्री कामावरून घरी जात असताना राज थापा हा तिच्याकडे बघत हसून तिचा पाठलाग करू लागला.
मेडिकल दुकानाजवळ त्याने या तरुणीला स्पर्श करून तिचा हात ओढला व तिची मान तिरकी हालवून फिर्यादीला इशारे करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक अर्चना कटके अधिक तपास करीत आहेत.