सावकारीच्या जाचातून एकाची विष पिऊन आत्महत्या; चिठ्ठीत दोन बड्या हस्तींची नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 11:36 PM2019-04-25T23:36:46+5:302019-04-25T23:38:32+5:30
आत्महत्येमुळे शहरात एकच खळबळ
नऱ्हे/पुणे : सावकारी जाचाला कंटाळून एकाने धायरी येथे विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ त्याच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीमध्ये शहरातील राजकीय क्षेत्राशी संबंधित दोघा जणांची नावे असून त्यांच्यामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यशवंत हरिभाऊ पवार (वय ५४, रा़ रायकर मळा, धायरी) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी धायरीतील पाण्याच्या टाकीवर जाऊन रोगर हे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, यशवंत पवार यांनी गुरुवारी दुपारी २ वाजता आपल्या पत्नीला व्हाट्सऍपवर आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी पाठविली होती. त्यानंतर त्यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन रोगर हे विषारी औषध प्राशन केले. पतीने पाठविलेला मेसेज त्यांच्या पत्नीने बराचवेळ पाहिला नाही. सायंकाळी पाच वाजता त्यांनी पतीचा मेसेज पाहिला. त्यानंतर त्यांनी पतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत दोन तरुण डोंगराच्या भागातून जात होते़ त्यांना तिथे मोटारसायकल आढळून आल्याने त्यांनी आसपास पाहिले. तेव्हा त्यांना पाण्याच्या टाकीवर यशवंत पवार यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्यांची तपासणी केली. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. तसेच त्यांच्या नातेवाईकांचे फोन नंबरही त्यात होते. त्यांनी नातेवाईकांना बोलावून घेऊन खात्री केली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवून दिला.
यशवंत पवार हे वायरमन असून ते काँट्रक्ट घेऊन काम कराययचे. यशवंत पवार यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. पत्नी कामाला गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पतीचा मेसेज पाहिला नव्हता. पवार यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत आपण सावकारीला कंटाळून या दोघांनी माझ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आणली आहे. त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, चिठ्ठीतील दोन नावाविषयी आताच काही सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पवार यांच्या आत्महत्येबाबत तपास केल्यानंतर आवश्यक तो गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी सांगतले.
यशवंत पवार यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत शहरातील दोन मोठ्या हस्तींची नाव असल्याने ती नावे आता पोलीस उघड करीत नसल्याचे समजते. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी जितेंद्र जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर यांच्या नावाने चिठ्ठी लिहून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर दीपक मानकर यांच्यावर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. गेल्या सहा महिन्याहून अधिक काळ ते तुरुंगात आहेत. हाही असाच काहीसा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.