'Man ki Baat’ मध्ये पंतप्रधानांकडून पुण्यातील 'या' संस्थेच्या प्रकल्पाची प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 06:37 PM2021-12-26T18:37:22+5:302021-12-26T18:37:32+5:30

जगभरात भारतीय संस्कृतीची पाळेमुळे रुजवण्यात पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचा मोलाचा वाटा

In man ki baat the prime minister narendra modi praised the project of organization in pune | 'Man ki Baat’ मध्ये पंतप्रधानांकडून पुण्यातील 'या' संस्थेच्या प्रकल्पाची प्रशंसा

'Man ki Baat’ मध्ये पंतप्रधानांकडून पुण्यातील 'या' संस्थेच्या प्रकल्पाची प्रशंसा

Next

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी ‘मन की बात’ (Man ki Baat) या कार्यक्रमात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचा (Bhandarkar Institute Pune) सन्मानाने उल्लेख केला. ‘आपली संस्कृती प्राचीन ग्रंथ आणि सांस्कृतिक मुल्ये जपणारी आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात भारतीय संस्कृतीची पाळेमुळे रुजवण्यात पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचा मोलाचा वाटा आहे. या संस्थेमध्ये इतर देशातील लोकांना महाभारताची ओळख व्हावी, या उद्देशाने ऑनलाईन वर्गांचे प्रशिक्षण सुरु केले आहे. अभ्यासक्रमांमध्ये शिकवला जाणारा आशय प्राचीन आणि वैभवशाली आहे. सातासमुद्रापार असलेल्या भारतीय संस्कृतीची ओळख नावीन्यपूर्ण माध्यमातून करुन दिली जात आहे’, असे गौरवोदगार त्यांनी काढले.

भांडारकर संस्थेमध्ये सध्या महाभारताची सांस्कृतिक सूची हा प्रकल्प सुरू आहे. कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव सुधीर वैशंपायन, प्रकल्पाच्या सहाय्यक संपादिका डॉ. गौरी मोघे आणि न्यानसा टीम यांच्या मदतीने प्रकल्पाचे काम सुरू आहे. 

'लोकमत'शी बोलताना मोघे म्हणाल्या, 'सामान्यांना महाभारताविषयी कायम आस्था आणि उत्सुकता वाटते. त्यांना महाकाव्य जाणून घेता यावे,यासाठी १८ पर्वांचा परिचयात्मक अभ्यास ऑनलाईन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. महाकाव्याची रचना, वैशिष्ट्ये, भावार्थ, बांधणी अशी रचना करण्यात आली आहे. आतापर्यंत चार बॅचेसमध्ये ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. भारत, अमेरिका तसेच विविध देशांमधील १२०० लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. आता अभ्यासक्रम क्लाउड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठराविक शुल्क भरून लोक याचा लाभ घेऊ शकतात. यासाठी विशेष फोरमही तयार केला जाणार आहे.'

कोरोना काळात भांडारकर संस्थेतर्फे अनेक ऑनलाईन वर्ग सुरु करण्यात आले आहेत. देशविदेशातील लोकांचा या वर्गांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. भांडारकर संस्थेने शताब्दी काळात अनेक महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेतले. त्यामध्ये महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचा समावेश आहे. देशविदेशासह ३१६ भाषांमधील महाभारताच्या १६०० प्रती एकत्र करुन त्यातील ८०० प्राचीन पोथ्यांमधील प्रत्येक शब्दाचा तौलनिक अभ्यास करण्यात आला आहे. लाखो श्लोक आणि शब्दांचा तौलनिक अभ्यास करुन महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीला मोठ्या प्रमाणात मागणी प्राप्त झाली आहे.

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्थेची घेतलेली दखल ही आमच्या कामाची मोठी पोचपावती आहे. या माध्यमातून लोकांना महाभारताविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढेल. पुढील नियोजनामध्ये हा सन्मान अतिशय प्रेरणादायी ठरेल असे गौरी मोघे यांनी सांगितले.''

Web Title: In man ki baat the prime minister narendra modi praised the project of organization in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.