...अखेर ईश्वर माणसात आला; साडेआठ वर्षे होता कचऱ्यात, नंतरची साडेतीन वर्षे मनोरुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 08:48 PM2021-12-01T20:48:09+5:302021-12-01T20:51:33+5:30
''ईश्वर''ची कथा ऐकून खरंच विश्वास बसणार नाही परंतु ही सत्यघटना आहे.
पांडुरंग मरगजे
धनकवडी : कथा कचराकुंडीत आयुष्य कंठणाऱ्या एका ''ईश्वर''ची, ज्याला हेल्पिंग हॅन्ड सोशल फाउंडेशनच्या संचालिका स्वाती सुभाष डिंबळे यांनी कचराकुंडीतून बाहेर काढून पुन्हा माणसांत आणले. तब्बल साडेआठ वर्षे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आणि त्यानंतर साडेतीन वर्षे मनोरुग्णालायमध्ये उपचार घेणारा ईश्वर आज माणसात आला. ''ईश्वर''ची कथा ऐकून खरंच विश्वास बसणार नाही परंतु ही सत्यघटना आहे.
तळेगाव दाभाडे येथील कचराकुंडीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो नवनाथ राठोड यांनी स्वाती डिंबळे यांना समाजमाध्यमांवर पाठवला. हेल्पिंग हॅन्ड सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्वाती डिंबळे या आसरा अनाथांना हक्काचा निवारा देण्याचे काम करतात. तो फोटो पाहून त्यांना धक्काच बसला. एक माणूस चक्क कचराकुंडीमध्ये पडून आयुष्य कंठत होता. म्हणून स्वामी डिंबळे यांनी त्याला आधार देण्याचं ठरवलं.
तळेगाव दाभाडे येथे पोहोचल्यावर तेथील कचराकुंडीत एक तरुण फक्त एक लुंगी अंगावर असलेल्या स्थितीत तब्बल साडेआठ वर्ष कडाक्याची थंडी झेलत, दुर्गंधी सहन करत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात निपचित पडलेला होता. कचरा आणि तो जवळपास एकरुप झाला होता. त्याला आपल्या घरच्यांचं नाव, पत्ता काहीच सांगता येत नव्हता.
इतकेच काय, तो केवळ ''ईश्वर'' या एका शब्दाशिवाय काही बोलू शकत नव्हता. म्हणून त्याला ''ईश्वर'' असे नाव दिले. दरम्यान, नवनाथ राठोड व काही सहकाऱ्यांसोबत लांब जटा कापून काढल्या. कित्येक वर्षांनंतर त्याला आंघोळ घालण्यात आली आणि हॉटेलचे जेवण दिले. नातेवाईक न मिळाल्याने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या मार्फत ईश्वरच्या कायदेशीर पालकत्व घेऊन मनोरुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, त्याला पाहण्यासाठी रुग्णालायत गेल्या असता "ताई, तू माझं आयुष्यच बदललं ! " असे भावनिक उद्गार काढले. आणि "ताई, मला इथून बाहेर कधी नेणार ? मला बाहेरचे जग बघायचंय ! असे बोलून येथून बाहेर पडण्याची आपली इच्छा व्यक्त केली. उपचारानंतर स्मृती परत आली होती. तो लाॅंड्रीमध्ये काम करीत होता त्या मालकाचा नाव पत्ता सांगितला. त्या माध्यमातून ईश्वरच्या मामाचा संपर्क मिळाला. परंतु शिक्षक मामाने त्याचा स्वीकार करण्यास नकार दिला. अखेर कोर्टामध्ये असे ठरले की मामाने मेंटल हॉस्पिटलमधून ईश्वरचा डिस्चार्ज घ्यायचा आणि स्वाती डिंबळे यांनी त्याचा सांभाळ करायचा.