नकार पचविण्याचे भान पुरुषाला पाहिजेच; बाईच्या नव्हे, ‘पुरुषा’च्या सक्षमीकरणाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 01:45 PM2020-02-05T13:45:54+5:302020-02-05T13:56:58+5:30

हिंगणघाट एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेला जाळण्याच्या प्रयत्नावर संताप 

The man must feel the rejection | नकार पचविण्याचे भान पुरुषाला पाहिजेच; बाईच्या नव्हे, ‘पुरुषा’च्या सक्षमीकरणाची गरज

नकार पचविण्याचे भान पुरुषाला पाहिजेच; बाईच्या नव्हे, ‘पुरुषा’च्या सक्षमीकरणाची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देएकतर्फी प्रेमातून महिला-तरुणींवर अत्याचाराच्या घटना घडतात वारंवारदोष सिद्धतेसाठी काळजीपूर्वक प्रयत्न करण्यासाठी दिले पत्र 

पुणे : खूप झाली स्त्री सक्षमीकरणाची भाषा... तिच्या सबलीकरणाचे प्रयत्न. खरी आवश्यकता आहे ती  ‘पुरुषा’च्या सक्षमीकरणाची.  पुरुषाला ‘माणूस’ म्हणून घडविण्याची. स्त्रीच्या भावनांचा आदर राखत ‘नकार’ कसा पचवायचा, याचे भान पुरुषांना यायलाच पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. एकतर्फी प्रेमातून महिला-तरुणींवर अत्याचाराच्या घटना वारंवार घडतात, यास पोलीस यंत्रणांची दिरंगाईदेखील तितकीच कारणीभूत आहे. आसपास हिंसक घटना घडत असताना ‘बघ्या’ची भूमिका घेणाऱ्या समाजाकडे दोषाचे बोट जाते. या घटना रोखायच्या तर शहरांचे, गावांचेच ‘सेफ्टी ऑडिट’ केले पाहिजे. लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समितीच्या कामाचीही नियमित पाहणी व्हायला हवी, याकडेही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले.  
हिंगणघाट (जि. वर्धा) येथे प्राध्यापक महिलेला जिवंत जाळण्याच्या घटनेनंतर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. हैदराबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून टाकण्याच्या घटनेची जखम अद्याप भरलेली नसताना  पुन्हा अशाच प्रकारची घटना महाराष्ट्रात घडल्याने सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. महिलांवरील अत्याचारांमध्ये होणारी वाढ चिंताजनक असून, महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महिला चळवळीत काम करणाऱ्या ज्येष्ठ कायर्त्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्यावेळी स्त्रीच्या सन्मानासाठी, सुरक्षिततेसाठी पुरुषी मानसिकतेमध्येच बदल घडवण्याची नितांत गरज असल्याचे मत प्राधान्याने व्यक्त करण्यात आले.
..........
दोष सिद्धतेसाठी काळजीपूर्वक प्रयत्न करण्यासाठी दिले पत्र 
वर्ध्यातील तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी व तपासणी अधिकारी यांना यातील दोषींवर सक्त कायदेशीर कारवाई करावी, तसेच पीडितेला शासकीय योजनेतून अर्थसहाय्यता देण्याबाबत व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे निर्देश  संबंधितांना द्यावेत. राज्यात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने सर्व पोलीस पथकांना रोडरोमिओ/छेडछाड प्रतिबंधक पथकांना सातत्य व तत्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. महिलाविरोधी विविध प्रकारचे हिंसाचार, बलात्कार, विनयभंग आदी गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपी यांना जामीन न मिळण्यासाठी आवश्यकता भासल्यास विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्त करणे व कार्यरत पोलीस अभियोक्त्यांना अशा प्रकरणात न्यायालयात दोष सिद्धतेसाठी काळजीपूर्वक प्रयत्न केले जावेत, असे पत्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले आहे. वर्धा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून आरोपीला कडक शिक्षा होण्याच्यादृष्टीने पीडित मुलीचा जबाब त्वरित घेण्याच्या सूचना केल्या आहेत. अशा घटना थांबण्यासाठी सरकारने घटना जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे. तसेच प्रलंबित खटल्यातील आरोपींना तत्काळ शिक्षा होण्याच्यादृष्टीने पावले उचलावीत, अशी सरकारला सूचना केली आहे. काही दिवसांतच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर बैठक घेऊन महिला अत्याचारांचा आढावा घेतला जाणार आहे, असे विधानसभा उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी सांगितले. 
......
‘मिळून साºयाजणी’च्या संपादिका गीताली वि. म म्हणाल्या, महिलांवर अत्याचार करणाºया पुरुषांची मानसिकता बदलण्याला आता प्राधान्य देण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही मुलांसाठी ‘दोस्ती जिंदाबाद’ हा उपक्रम राबविला होता. त्यात मुलांच्या होस्टेलमध्ये जाऊन ‘नकारा’चा स्वीकार करता आला पाहिजे. तिने ‘नाही’ म्हटलं, म्हणून मर्दानगी जात नाही, हे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. ‘नकाराचा स्वीकार करण्याचं पुरुषभान जागृत होणं आवश्यक आहे. कारण पुरुष मर्दानगीलाच आपली शक्ती मानतात. स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड आणि अहंकार दुखावल्याची भावना घर करीत आहे. मला स्त्री श्रेष्ठ मानत नाही, म्हणून ते हिंसक बनत आहेत. त्यामुळे आता पुरुषांच्याच सक्षमीकरणाची खरी गरज आहे. 
.........
नारी समता मंचाच्या साधना दधिच यांनी स्त्री अत्याचारावरील घटनांना पोलीस यंत्रणेची दिरंगाई कारणीभूत असल्याचे सांगितले. आजचा पुरुष वेगवेगळ्या कारणांमुळे कुटुंबापासून तुटत चालला आहे. त्यांना त्यांच्या राग आणि इच्छांवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. महाराष्ट्रात स्त्री अत्याचाराच्या गुन्ह्याची किती नोंद होते हादेखील प्रश्न आहे. शहरांमध्ये ‘सेफ्टी आॅडिट’ केले जाते का? तर नाही. हे होणे आवश्यक आहे आणि त्यातून उपाययोजना करता येतील. 
........
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रृती पानसे यांनी या घटना रोखायच्या असतील तर शाळांमधील किशोरवयीन मुलांपासूनच सुरुवात करायला पाहिजे, हा महत्त्वपूर्ण मुद्दा अधोरेखित केला. मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारी मानसिकता हा सध्याचा चिंताजनक विषय आहे. शिक्षक आणि पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबामध्ये जर आईला वडील मारहाण करीत असतील आणि आई सहन करीत असेल तर या चुकीच्या गोष्टी मुलांच्या मनावर नकळत रुजतात. यासाठी कुटुंबामध्येच आई, बहीण, मुलगी यांना सन्मानाने वागवण्याचा महत्त्वपूर्ण संस्कार दिला गेला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. 

Web Title: The man must feel the rejection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.