व्हाट्सअपवर स्टेटस ठेवून तरूणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 04:44 PM2019-07-10T16:44:38+5:302019-07-10T16:47:19+5:30
‘मी आत्महत्या करत असूून माझ्या मृत्यूस माझा साडू व मेव्हणी जबाबदार आहेत’ असे व्हाट्सअप स्टेटस ठेवून एका तरुणाने रेल्वे खाली आत्महत्या केली.
पुणे (लोणी काळभोर) : ‘मी आत्महत्या करत असूून माझ्या मृत्यूस माझा साडू व मेव्हणी जबाबदार आहेत’ असे व्हाट्सअप स्टेटस ठेवून एका तरुणाने रेल्वे खाली आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. चांद रफिक शेख ( वय २८, रा. तारमळा, थेऊर, ता हवेली ) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चांद हा आईवडील एकुलता एक मुलगा होता. आई आजारपणामुळे अनेक महिन्यांपासून अंथरुणाला खिळून तर वडील एका पायाने अधू असल्याने तो कमवेल यांवरच त्यांचे घर चालत होते. चांद याचे पहिले लग्न झाले होते. मात्र तीन वषार्पूर्वी त्याने पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर २५ जून रोजी त्याने सखाराम नगर, थेऊर येथे रहात असलेल्या सना या तरूणीशी पुणे येथील न्यायालयात त्याने दुसरा विवाह केला. बुधवार (३ जुलै) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे थेऊर येथे कामाला गेला होता. त्यादिवशी त्याचा साडू व मेव्हणी हे त्याच्या घरी गेले व सना हिची आई आजारी असल्याचे कारण सांगून तिला घेऊन गेले होते. तिला दोन दिवसात परत पाठवतो असे सांगितले होते. त्यानंतर चांद व त्याचे वडील सनाला आणण्यासाठी तिच्या घरी गेले तेेंव्हा सनाच्या आई, वडील, बहिण व दाजी यांनी तिला पाठविले नाही. सनालाही त्याने विनंती केली मात्र तिने येण्यास नकार दिला.
त्यामुळे मंगळवारी ( ९ जुलै ) रोजी रात्री तो जेवला नाही. आज सकाळी साडेदहावाजता त्याने त्याच्या व्हॉटस अपवर आत्महत्या करण्याबाबत स्टेटस लिहिले, मी आत्महत्या करत असून माझ्या मृत्यूस माझा साडू व मेव्हणी जबाबदार आहे.’ ते वाचल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचा मृतदेह कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेल्या रेल्वे रूळावर सापडला.