रिक्षा हटवायला गेले आणि सोनसाखळी गमावून बसले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 07:40 PM2019-12-02T19:40:49+5:302019-12-02T19:49:07+5:30
चांगल्या हेतूने केलेली मदत महागात पडल्याचे उदाहरण पुण्यात बघायला मिळाले आहे. समोर अपघात झाल्यामुळे रस्त्यावर आलेली रिक्षा हटवण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीची सोनसाखळी चोराने लंपास केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पुणे : चांगल्या हेतूने केलेली मदत महागात पडल्याचे उदाहरण पुण्यात बघायला मिळाले आहे. समोर अपघात झाल्यामुळे रस्त्यावर आलेली रिक्षा हटवण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीची सोनसाखळी चोराने लंपास केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या संदर्भात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजिंक्य माने (वय ३२, रा. गोकुळनगर, कोंढवा ) यांनी तक्रार दाखल केली आहे.
अधिक माहिती अशी की, शनिवार (दि.३०) रोजी फिर्यादी त्यांची पत्नी व मुलीसह कारमधून जात होते. त्यावेळी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान कात्रज- कोंढवा बुद्रुक रस्त्यावरील गोकुळनगर येथील तीन नंबरच्या लेनमधून जात असताना समोर दुचाकी व रिक्षाचा अपघात झाला. त्यावेळी झालेल्या गर्दीमुळे कार पुढे जाणेही शक्य नव्हते. अशावेळी समोरील रिक्षा हटवण्यासाठी फिर्यादी बाहेर पडले. तिथे रिक्षा बाजूला करत असताना गर्दीतील एका अनोळखी इसमाने त्यांची ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेली. चेन गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेतली. या प्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.