कचऱ्यावर कवनं रचणारा अवलिया ‘बिगारी’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 05:15 PM2019-11-15T17:15:41+5:302019-11-15T19:14:54+5:30

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल :

A man who created new song on garbage | कचऱ्यावर कवनं रचणारा अवलिया ‘बिगारी’

कचऱ्यावर कवनं रचणारा अवलिया ‘बिगारी’

googlenewsNext
ठळक मुद्देविविध स्वरुपाची गाणी रचून करतात जनजागृती

पुणे : सध्या महापालिकेच्यावतीने स्वच्छ भारत अभियानात अव्वल क्रमांक मिळविण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत. स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. परंतू, हे अभियान अस्तित्वातही आलेले नव्हते तेव्हापासून पालिकेचा एक स्वच्छता कर्मचारी कचऱ्यावर कवनं रचून वर्षानुवर्षे जनजागृती करीत आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देतानाच प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम, लोकांची मानसिकता यावर गीतांच्या माध्यमातून नेमके बोट ठेवणारा हा अवलिया ‘बिगारी’ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
महादेव जीवराज जाधव (वय ५७, रा. येवलेवाडी) असे या स्वच्छता कर्मचाऱ्याचे नाव आहे. जाधव हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील थोरली उपळाई या गावचे आहेत. त्यांच्या जन्मापुर्वीचे त्यांच्या कुटुंबाने पुण्यामध्ये पोटापाण्यासाठी स्थलांतर केले होते. सुरुवातीला महात्मा फुले पेठेत राहणारे जाधव यांचे वडील महापालिकेमध्ये नोकरीस लागले. गाव सोडल्याने जगण्यासाठी त्यांनी जोडीला केरसुन्या बांधून विकण्याचा व्यवसाय केला. जाधव हे सुद्धा त्यांना त्यामध्ये मदत करीत असत. आईसोबत झाडणकामासाठी जाणे, गजरे विकणे अशी कामे ते करीत असत. त्यांचे आई-वडिल कीर्तन सुद्धा करायचे. कवनं , गाणी रचणे हा त्यांचा छंद होता. दोघांचाही आवाज सुंदर होता. त्यामुळे वयाच्या नवव्या वर्षापासून जाधव यांनाही गाण्याची आवड निर्माण झाली. 
हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण न घेता आलेल्या जाधव यांनी १९९४ साली पालिकेत रोजंदारीवर काम करायला सुरुवात केली. पाच वर्षांच्या मेहनतीनंतर कचरा मोटार बिगारी म्हणून ते कायम झाले. याच काळात ते पालिकेच्या युनियनमध्ये काम करु लागले. तत्कालीन डॉ. नितीन करीर यांनी पदभार घेतल्यानंतर कॉम्रेड मुक्ता मनोहर यांनी त्यांची ओळख करीरांसोबत करुन दिली. त्यावेळी जाधव यांनी  ‘सांगाया तुम्हाला, आव्हान हे तुम्हाला, तुम्हासाठी आहे सदैव, सफाई सैनिक जोडीला’ असे गीत गायले. तेथे उपस्थित असलेल्या महापौर अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनीही त्यांचे कौतूक केले. करीर यांनी त्याचवेळी पालिकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कलापथक करण्याचा निर्णय घेतला. 
कॉ. मनोहर, जाधव आणि व्हेईकल डेपोचे प्रमुख किशोर पोळ यांच्यासह अनेकांनी एकत्र येत हे कलापथक २००५ साली स्थापन केले. श्रमिक भवनात झालेल्या कार्यक्रमात डॉ. करीर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. यशदामध्ये राज्यातील महापौरांची परिषद असताना तत्कालीन महापौर राजलक्ष्मी भोसले यांच्या सोबत जाधव गेले होते. त्यावेळी जाधव यांनी तत्काळ  ‘कचरा सुखा और गिला... सबने मिलाकर डाला... कचरे ने लेली मेरी जान... गौर से सुनिये मेहरबान’ हे गाणे रचून सादर केले. 
जाधव अशीच कचऱ्याच्या वर्गीकरण आणि स्वच्छतेविषयी गाणी गात गात रस्त्यावर झाडण काम करीत असतात. ‘स्वच्छतेचे वारकरी, जातील घरोघरी’ यासह त्यांनी अनेक गाणी रचली. या कामात आपल्याला आनंद मिळत असून स्वच्छतेच्या कामात स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांची पालिकेला मोठी मदत होत आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे मोठे काम ही मंडळी करीत असल्याचे जाधव यांनी सांगितले. आपले शहर आणि परिसर आपणच स्वच्छ ठेवायला हवा, आपण प्लास्टिकचा वापर टाळायला हवा असेही जाधव म्हणाले. 
=====
त्यांनी चारही मुलांना उच्च शिक्षित बनविले आहे. त्यांचा मोठा मुलगा एका बड्या कंपनीत उच्चपदस्थ आहे. तर छोटा मुलगा उच्चशिक्षित आहे. दोन्ही मुलींची लग्न झालेली असून मोठे जावई पोलीस निरीक्षक आहेत. तर छोटे जावई एका इंग्रजी दैनिकामध्ये ठाणे येथे पत्रकार आहेत. जाधव यांच्या या आगळ्यावेगळ्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांचे नेहमीच कौतूक होत असते. असेच गाण गात काम करीत असल्याचा त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

Web Title: A man who created new song on garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.