स्वप्न पडली नसती तर माणसाला वेड लागलं असतं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:16 PM2020-01-23T18:16:44+5:302020-01-23T18:19:41+5:30
त्यामुळेच स्वप्ने ही चमत्कारिक आणि विचित्र वाटतात.
पुणे : जागेपणी अपु-या राहिलेल्या इच्छा झोपेतल्या एका विशिष्ट अवस्थेत पडतात. या इच्छांची चित्रे एकमेकांवर छापली जाऊन ती वेगाने पुढं नेली जातात. त्यामुळेच स्वप्ने ही चमत्कारिक आणि विचित्र वाटतात. मात्र ही स्वप्ने पडली नसती तर माणसाला वेड लागलं असतं, ही स्वप्न पडत असल्यामुळंच आपण निरोगी जीवन जगू शकतो, असं प्रतिपादन ज्येष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके यांनी केले.
गुरुकुल प्रतिष्ठान आणि 'सत्कार्योत्तेजक सभा, धुळे' यांच्या संयुक्त विद्यमाने स्वप्न - मराठी कविता आणि मनोवैज्ञानिक दृष्टी या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात मानसतज्ज्ञ डॉ. सी. जी. देशपांडे, डॉ. मेधा कुमठेकर, तनुजा डफळे, डॉ. लता कांकरिया, लेखक प्रा. श्याम भुर्के, डॉ. भालचंद्र कापरेकर, अमृता देसर्डा आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, सत्कार्योत्तेजक सभेचे अध्यक्ष प्रा. विश्वास नकाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. लुकतुके म्हणाले, लहानपणापासून अनेक इच्छा नेणिवेत साठवलेल्या असतात. त्यातल्या काही इच्छा पूर्ण होतात आणि काही अपुऱ्या राहतात. अपु-या इच्छा पूर्ती मागतातच. त्यांची त्याप्रमाणात स्वप्नांद्वारे पूर्ती होते. त्या प्रमाणात नेणिवेतील इच्छांचा हलकल्लोळ कमी होतो आणि मानवी जगणे सुकर होते.
डॉ. मेधा कुमठेकर यांनी झोपेच्या आणि स्वप्नाच्या विविध अवस्था उलगडून सांगितल्या. त्या म्हणाल्या, स्वप्न प्रत्येक सजीवाला झोपेत पडतात. त्याला कोणीही अपवाद नाही. माणसाला झोप जितकी आवश्यक आहे, तसेच स्वप्न पडणेही आवश्यक आहे.कांकरिया यांनी विविध संस्कृतीत स्वप्नाचा नेमका काय विचार केला आहे, ते उलगडून सांगितलं. डॉ. देशपांडे यांनी स्वप्न आणि त्यांचे अर्थ याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं.समर्थ रामदासांचं आनंदवनभुवनी हे मराठीतलं पहिलं स्वप्न काव्य असल्याचं सांगून डॉ. कामत म्हणाले, ही कविता म्हणजे ओव्यांची प्रकरणात्मक कविता आहे. असामान्य महापुरुष भविष्य सांगत नाहीत तर ते भविष्याचं सूचन करतात. समर्थांनी ते केलं होतं. स्वप्न ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्यांच्या घराण्यात कुणी हे पाहिलं नव्हतं ते स्वप्न त्यांनी मावळ्यांमध्ये पेटवल्यामुळंच ते स्वराज्य निर्माण करू शकले.यावेळी डॉ. भालचंद्र कापरेकर, शुभदा वर्तक, अमृता देसर्डा यांनी मराठीतील स्वप्न काव्यांचा वेध घेतला.