आंतरराष्ट्रीय मराठी शाळा काढण्याचा मानस : कराड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 02:57 AM2019-02-22T02:57:33+5:302019-02-22T02:57:56+5:30
जागतिक स्तरावर २१ फेबु्रवारी हा दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
पुणे : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त भविष्यात जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय मराठी शाळा काढण्याचा आमचा मानस आहे. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी ज्याप्रमाणे केंब्रिज आणि आयबीसारख्या अनेक संस्था जागतिक स्तरावर कार्य करीत आहेत, त्याच धर्तीवर दर्जेदार मराठी भाषा शिकविण्याचे कार्य करण्याची माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
जागतिक स्तरावर २१ फेबु्रवारी हा दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत राज्यभाषा सल्लागार समितीच्या सदस्या स्वाती राजे, लेखिका ऊर्मिला विश्वनाथ कराड, संस्कृतचे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, मंदा उदय नाईक, गायक सलील कुलकर्णी उपस्थित होते.
कराड म्हणाले की, मातृभाषेतच प्रत्येक व्यक्तीची मानसिक प्रगती होत असते. त्यांचा भावनात्मक विकाससुद्धा उत्तम प्रकारे होतो. परंतु आज इंग्रजी ही प्रतिष्ठेची भाषा बनली आहे. त्या माध्यमातून उत्तम रोजगार मिळतो. परंतु आता दोन पावले पाठीमागे जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी शाळा काढण्याची आमच्यावर वेळ आली आहे. राज्यात शिक्षण संस्थांचे मोठे जाळे आहे. त्यांच्या आधारे मराठी शाळा काढाव्या. मराठी बाणा घेऊन कार्य करणारे लोक, तसेच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. सलील कुलकर्णी म्हणाले, की दोन मराठी माणसेसुद्धा इंग्रजीमध्ये बोलतात. मराठी भाषा बोलताना ती तुच्छतेने बोलली जाते. इंग्रजी मात्र मोठेपणाचे लक्षण आहे.