गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालकाचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:12 AM2021-07-29T04:12:15+5:302021-07-29T04:12:15+5:30
पुणे : गुडवीन ज्वेलर्समधील स्कीम, भिशी आणि ठेवींमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक परतावा अथवा सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून तक्रारदारासह ...
पुणे : गुडवीन ज्वेलर्समधील स्कीम, भिशी आणि ठेवींमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक परतावा अथवा सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून तक्रारदारासह ५३१ गुंतवणूकदारांची तब्बल १६ कोटी ९३ लाख ७८ हजार ६०१ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणात ज्वेलर्सच्या मॅनेजिंग डायरेक्टरचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस.एस गोसावी यांनी बुधवारी फेटाळला.
सुनीलकुमार मोहनन अक्कारकरन असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. पिंपरीमधील ६४ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार निगडी पोलीस ठाण्यात गुडविन ज्वेलर्सचे रितेश, मूळ केरळचे सुनीलकुमार अक्कारकरन आणि सुधीरकुमार मोहनन अक्कारकरन (संचालक) तसेच रवि के नायर (मँनेजर) आणि सेतू पनीकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुनीलकुमार आणि सुधीरकुमार मोहनन अक्कारकारन यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांची ३ लाख रूपये तर फिर्यादीसह फिर्यादीमध्ये समाविष्ट इतर गुंतवणुकदारांच्या तक्रारीमधील एकूण फसवणुकीची रक्कम ही ३ कोटी ४ लाख ४३ हजार ८८० रूपये इतकी आहे. तपासादरम्यान, आरोपींनी ५३१ गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. सुनीलकुमार आणि सुधीरकुमार मोहनन यातील मुख्य आरोपी असून, त्यांच्याविरूद्ध निगडी आणि कोरेगाव पोलीस स्टेशनसह महाराष्ट्रात फसवणुकीचे व एमपीआयडी कायद्यान्वये एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. आरोपी सुनीलकुमार अक्कारकरन याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला जामीनावर सोडल्यास यातील साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता आहे. केरळमध्ये जाऊन स्थावर व जंगम मालमत्ता तो नातेवाईकांच्या नावे वळती करण्याची शक्यता आहे, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी केला.