वसंतोत्सवात रंगणार ‘मानापमान’!
By admin | Published: January 11, 2017 03:36 AM2017-01-11T03:36:45+5:302017-01-11T03:36:45+5:30
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतासह, नाट्यसंगीत, फ्यूजन आदी संगीत प्रकारांनी सजलेला वसंतोत्सव यंदा २० ते २२ जानेवारी दरम्यान रंगणार आहे.
पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतासह, नाट्यसंगीत, फ्यूजन आदी संगीत प्रकारांनी सजलेला वसंतोत्सव यंदा २० ते २२ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. कृष्णाजी खाडिलकर लिखित प्रसिद्ध संगीत नाटक ‘मानापमान’ हे यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण असून, बालगंधर्वांनी अजरामर केलेल्या या कलाकृतीचे सुश्राव्य सादरीकरण गायक राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे करतील.
रसिकांप्रती कृतज्ञता म्हणून याही वर्षी वसंतोत्सव विनामूल्य असणार असल्याची घोषणा शास्त्रीय गायक व डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
अभिजात भारतीय संगीतरत्न असलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात येते. न्यू इंग्लीश स्कूल रमणबाग येथे सायंकाळी ५.४५ ते १० या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे. पत्रकार परिषदेला विशाल गोखले, पूनम गोखले आणि मिलिंद मराठे उपस्थित होते.
वसंतोत्सवाचे उद्घाटन दि. २० रोजी ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचे गायक पं. व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने होईल. त्यानंतर कृष्णाजी खाडिलकर लिखित प्रसिद्ध संगीत नाटक ‘मानापमान’चे सादरीकरण होईल. दुसऱ्या दिवसाची (दि. २१) सुरुवात सिनेगायिका रेखा भारद्वाज यांच्या गायनाने होईल. आपल्या वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करत दुसऱ्या दिवसाचा समारोप प्रख्यात बासरीवादक पं. रोणू मुजुमदार आणि राहुल देशपांडे यांच्या एकत्रित सादरीकरणाने होईल.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात आनंदगंधर्व म्हणून परिचित असलेले किराणा घराण्याचे गायक आनंद भाटे यांच्या गायनाने होईल. महोत्सवाचा समारोप इंडियन ओशन या प्रख्यात रॉक बँडचे गायन व वादक पं. विश्व मोहन भट यांच्या फ्युजनने होईल.
याही वर्षी ‘वसंतोत्सव विमर्श’ या एकदिवसीय संगीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १९ रोजी घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात आयोजित करण्यात येणार आहे.
याअंतर्गत होणाऱ्या पहिल्या सत्रात सकाळी ११ ते १ या वेळेत प्रसिद्ध गायक पं. विजय कोपरकर रियाजाच्या विविध पद्धती आणि त्यांचे महत्त्व उपस्थितांना उलगडून सांगतील. दुपारी २ ते ४ या वेळेत दुसऱ्या सत्रात ते राग खुलवण्याच्या काही प्रकारांबद्दल रसिकांना मार्गदर्शन करतील.
(प्रतिनिधी)
सुलभा ठकार, राजीव परांजपे यांना पुरस्कार
४ज्येष्ठ गायिका सुलभा ठकार व आॅर्गनवादक राजीव परांजपे यांना यंदाचा ‘डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सन्मान’ प्रदान केला जाणार आहे. ‘डॉ. वसंतराव देशपांडे उदयोन्मुख कलाकार पुरस्कार’ युवा गायक श्रीपाद लिंबेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी या पुरस्कारांचे वितरण होईल.