मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात दरडी कोसळल्या; एकेरी वाहतूक सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 04:23 PM2021-07-23T16:23:26+5:302021-07-23T16:46:14+5:30
संरक्षक भिंत, गटारे वाहून गेल्याने मंचर - भीमाशंकर महामार्गाचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान
डिंभे : मंचर - भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात काल रात्री अचानक वाढलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे हा रस्ता काही काळ वाहतूकीसाठी ठप्प झाला होता. मात्र प्रशासणाने तातडीने हालचाल करून कोसळलेल्या दरडीचा ढिगारे बाजूला करत या घाटातून एकेरी वाहतूक सुरू केली आहे.
आज रस्त्यावरील राडारोडा हटवण्याचे काम सुरू होते. अतिवृष्टीमुळे या घाटातील संरक्षक भिंत वाहून गेल्याने घाटात रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात आज मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. बुधवारी रात्री पासून सुरु असलेला पाऊस अजूनही संततधार कोसळत आहे. डिंभे धरण पाणलोटक्षेत्रात संततधार सुरू असून सुरू मुसळधार पावसामुळे आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजपर्यंत या भागात एकुण ५१० मी.मी. एवढा पाऊस झाला आहे.
बुधवारी रात्री पावसाचे प्रमाण अचानक वाढल्याने मंचर - भीमाशंकर या राज्य महामार्गावरील पोखरी घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. घाटात काही ठिकाणी मोठमोठे दगडू रस्त्यावर वाहून आले आहेत. गोहे पाझर तलावाच्या वरच्या बाजूला घाटाच्या वरची बाजू खचून दगड व माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली आहे.
काही झाडेही उन्मळून रस्त्यावर आल्याने हा रस्ता वाहतूकीसाठी पुर्णपणे बंद झाला होता. मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या दरडीचे अवशेष सर्वच्या सर्व एकदम बाजूला करणे शक्य नसल्याने खालच्या बाजून राडारोडा बाजूला करत हा रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला असून सध्या या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु झाली आहे.