मंचर: पावसाची शक्यता, शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:31+5:302021-04-12T04:09:31+5:30
मागील दोन दिवस वातावरणातील बदल जाणवत होता. पावसाचे वातावरण होऊ लागले होते. शुक्रवारी दुपारनंतर पावसाचे वातावरण झाले. शनिवारी सायंकाळी ...
मागील दोन दिवस वातावरणातील बदल जाणवत होता. पावसाचे वातावरण होऊ लागले होते. शुक्रवारी दुपारनंतर पावसाचे वातावरण झाले. शनिवारी सायंकाळी मात्र जोरदार वारा वाहू लागला होता. आकाशात ढगांची गर्दी झाली होती. विजांचा कडकडाट होत होता. कुठल्याही क्षणी पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पावसाने हुलकावणी दिली आहे. अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चारा झाकून ठेवण्यासाठी लगबग उडाली होती. प्लॅस्टिक कागद, ताडपत्री आदी टाकून चारा झाकून ठेवण्यात आला. अनेक शेतांमध्ये कांदा काढणी सुरू आहे. काढून ठेवलेला कांदा झाकून ठेवला जात होता. गहू पीक काढणी सुरू आहे. पाऊस पडला तर या गहू पिकाचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाउन असल्याकारणाने बाजारपेठा बंद आहेत. सर्वत्र शुकशुकाट असून शेतकऱ्यांना प्लॅस्टिक कागद मिळणे मुश्किल झाले आहे. पावसाचे वातावरण झाल्यानंतर घरातील अडगळीतील प्लॅस्टिक कागद, ताडपत्री बाहेर काढून त्याने शेतमाल झाकून ठेवण्यात आला आहे. दरम्यान रविवारी दिवसभर कडक ऊन पडले होते. दिवसभर जास्त उष्णता होती. मात्र सायंकाळपर्यंत पावसाचे वातावरण झाले नव्हते.
पावसाच्या शक्यतेने जनावरांचा चारा शेतकऱ्यांनी झाकून ठेवला आहे.