मंचर शहर कोरोनाचा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:26+5:302021-04-21T04:10:26+5:30
मंचर शहरात लॉकडाउन सुरु असतानाही काही उत्साही नागरिकांमुळे रस्त्यांवर, चौकाचौकांत गर्दी वाढत आहे. पोलिसांनी अनेक वेळा आवाहन करूनही ...
मंचर शहरात लॉकडाउन सुरु असतानाही काही उत्साही नागरिकांमुळे रस्त्यांवर, चौकाचौकांत गर्दी वाढत आहे. पोलिसांनी अनेक वेळा आवाहन करूनही नागरिक रस्त्यावर फिरणे थांबवत नाही. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मंचर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी दिली.
मंचर शहरात दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत असून त्यासाठी ग्रामपंचायत व तालुका प्रशासनाने एकत्रित निर्णय घेऊन मंचर शहर तीस एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बंदमधून मेडिकल, दवाखाने, बँक यांना वगळण्यात आले आहे. तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असून रस्त्यावर फिरताना दिसत आहे. कोणत्याही कारणाशिवाय फिरत असलेल्या नागरिकांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. मंचर शहरातील प्रत्येक चौकात पोलीस येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी केल्याशिवाय सोडत नसून स्वतः पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अपर्णा जाधव रस्त्यावर फिरून कारवाई करत होते. कारवाई होऊ लागल्याने नागरिक विनाकारण बाहेर पडण्यास धजावणार नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.