मंचरला विनामास्क फिरणाऱ्या ४० जणांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:17 AM2021-02-21T04:17:19+5:302021-02-21T04:17:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मंचर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मंचर ग्रामपंचायतीच्या वतीने वाहन फिरवून जनजागृती केली जात आहे. मंचर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मंचर ग्रामपंचायतीच्या वतीने वाहन फिरवून जनजागृती केली जात आहे. मंचर शहरात आज धडक कारवाई करत विनामास्क फिरणाऱ्या ४० जणांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर नागरिक काळजी घेताना दिसत नाही. चेहऱ्यावरचे मास्क गायब झाले आहेत. सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमाला गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यामध्ये रुग्णांची आकडेवारी वाढू लागल्याने मंचर ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने वाहन फिरवून जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावे, वारंवार हात धुवावे असे आवाहन ध्वनीक्षेपकद्वारे केले जात आहे. शहरात बहुतेक नागरिकांच्या तोंडाला मास्क नसतो. त्यामुळे मंचर ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
मंचर शहराच्या सरपंच किरण राजगुरू, उपसरपंच युवराज बाणखेले, ग्रामपंचायत सदस्य अरुण नाना बाणखेले, सतीश बाणखेले, श्याम थोरात, ज्योती थोरात ,संगीता बाणखेले तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मास्क न घालणाऱ्या चाळीस व्यक्तीवर कारवाई केली आहे. यावेळी पोलीस नाईक राजेंद्र हिले व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. याबाबत बोलताना उपसरपंच युवराज बाणखेले म्हणाले नियम मोडणाऱ्यांना सुरुवातीला पाचशे रुपये दंड केला जाणार आहे. मात्र, दुसऱ्यांदा नियम मोडणाराकडून एक हजार रुपये दंड वसूल केला जाईल. मंचर शहरात नागरिकांनी मास्कचा वापर करावा, नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.