मंचर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमुळे आघाडीत बिघाडी : आढळराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:27+5:302021-07-19T04:08:27+5:30
खेड व नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला आहे. आढळराव पाटील यांनी आदल्या दिवशी उद्घाटन उरकून घेतले, तर दुसऱ्या ...
खेड व नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला आहे. आढळराव पाटील यांनी आदल्या दिवशी उद्घाटन उरकून घेतले, तर दुसऱ्या दिवशी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उद्घाटनप्रसंगी आढळराव पाटील यांना यांच्यावर खरमरीत टीका केली. तसेच शरद पवार यांच्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले आहे असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना आढळराव पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, पुणे-नाशिक महामार्गावरील या पाच बायपास रस्त्याची मंजुरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगून मी मिळवली आहे. तशी कागदपत्रे माझ्याकडे आहे. मात्र या रस्त्याचे उद्घाटन करताना जाहिरातीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा साधा फोटो वापरला गेला नाही. हा रस्ता मंजूर करूनसुद्धा मला साधा फोन केला नाही. आघाडीत बिघाडी तुम्ही केली आहे, असा आरोप करून ते म्हणाले, खासदार कोल्हे, आमदार मोहिते व इतर १ ते २ वगळता आघाडीत कोणीही बिघाडी करत नाही. हे रस्ते माझ्या प्रयत्नातून मंजूर झाल्याने उद्घाटन करण्याचा अधिकार आम्हाला आहे. मुख्यमंत्र्यांवर बोलण्याची त्यांची उंची आहे का, असा सवाल करून ते म्हणाले, खासदार कोल्हे हे सध्या हवेत गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मोठे केले आहे. प्रकाशझोतात आणले, हे तुम्ही विसरलात. मी म्हातारा झाल्याची टीका कोल्हे यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अशी टीका करणार का, तुम्ही तरुण होता मग दीड वर्षे घरात का लपून बसला होता, असा सवाल करून ते म्हणाले, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संगनमताने राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असून आमचा आघाडीला विरोध नाही. मात्र ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत आहोत. खासदारकीला निवडून आल्यावर तुम्ही सर्व सोडून जनतेसाठी वेळ देणार असे म्हणाला होता. मात्र आता सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत शूटिंग करत असल्याचे वक्तव्य केले आहे. जनतेने तुम्हाला शूटिंगसाठी निवडून दिले का, असा सवाल करून आढळराव पाटील म्हणाले, खासदार असताना मला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. मी प्रयत्न केल्यामुळे पुणे नाशिक महामार्ग व हाई स्पीड रेल्वे ही कामे मार्गी लागली आहेत. कोल्हे यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडावा. शिरूरची ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली तरी मला काही फरक पडणार नाही. कारण आताही जनता मला खासदाराप्रमाणेच प्रेम करत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवार उभा करावा. मला काही हरकत नाही. माझा पक्ष मला सर्व काही देणार आहे. याची मला खात्री आहे, असे आढळराव पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. सात वर्षे झाली तरी पुरंदरला विमानतळ झाले नाही. सत्ता तुमची आहे. आता विमानतळ खेडला आणा, विमानतळ येथे होण्यासाठी माझा पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.