मंडल अधिकाऱ्यासह तलाठ्याला पकडले
By admin | Published: June 10, 2015 05:19 AM2015-06-10T05:19:17+5:302015-06-10T05:19:17+5:30
एक लाख ४० हजारांची लाच स्वीाकारणाऱ्या शिरूरच्या मंडल अधिकारी आणि तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
पुणे : नव्याने खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी खरेदीदाराकडे दोन लाख मागून तडजोडीअंती एक लाख ४० हजारांची लाच स्वीाकारणाऱ्या शिरूरच्या मंडल अधिकारी आणि तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी चंदननगर येथील हॉटेल नित्यानंद येथे ही कारवाई केली.
मंडल अधिकारी गणेश सूर्यभान मुंढे (४८, रा. चंदननगर) आणि रवींद्र प्रकाश जाधव (३७, रा. धानोरी) अशी अटक अधिकाऱ्यांची नावे आहेत. मुंढे हा मूळचा बीड जिल्ह्यामधील आंबेजोगाईचा आहे, तर जाधव हा उच्च शिक्षित असून, मूळचा जळगावचा रहिवासी आहे. तो २०१० मध्ये निवड मंडळामार्फत नियुक्त झालेला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्जुन सकुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने शिरूर तालुक्यातील मुखई येथील दहा गुंठे जागा खरेदी केली होती. या जागेच्या सातबारा उता-यावर नावाची नोंद करण्यासाठी मुंढे आणि जाधव यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती एक लाख ४० हजारांची लाच या दोघांनी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. या संदर्भात जमीनमालकाने एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली. आरोपींनी त्यांना नगर रस्त्यावरील हॉटेल नित्यानंदमध्ये बोलावले. खासगी व्यक्तीमार्फत लाचेची मागणी करून ती स्वीकारतानाच त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अर्जुन सकुंडे, सहायक आयुक्त जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.(प्रतिनिधी)