पुण्यातील मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; महावितरणचे आवाहन, आपत्कालीन परिस्थितीत विशेष क्रमांक उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 03:17 PM2024-09-03T15:17:06+5:302024-09-03T15:17:35+5:30

उत्सवात आपत्कालीन परिस्थितीत दहा दिवसांसाठी ७८७५७६७१२३ हा विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे

Mandals in Pune should get official electricity connection Calling for Mahavidran, special number available in case of emergency | पुण्यातील मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; महावितरणचे आवाहन, आपत्कालीन परिस्थितीत विशेष क्रमांक उपलब्ध

पुण्यातील मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; महावितरणचे आवाहन, आपत्कालीन परिस्थितीत विशेष क्रमांक उपलब्ध

पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना महावितरणकडून विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. यासाठी घरगुती दराने वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी अधिकृतपणे तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत उत्सवातील दहा दिवसांसाठी विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्किट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे, आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तातडीच्या मदतीची गरज भासल्यास पुणे व पिंपरी चिंचवड शहर, आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांसाठी पुणे परिमंडलाने उत्सवातील दहा दिवसांसाठी ७८७५७६७१२३ हा विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच नेहमीच्या १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही महावितरणने दिला आहे. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते. संततधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मंडपातील वीजयंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगच्या वायरची दैनंदिन तपासणी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Mandals in Pune should get official electricity connection Calling for Mahavidran, special number available in case of emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.