मंडळाचा कार्यकर्ता, व्यावसायिक नगरसेवक, नेता ते खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 11:36 PM2019-05-25T23:36:57+5:302019-05-25T23:37:20+5:30

अभ्यासपूर्ण सुसूत्रपणे, मुद्देसूदपणे बोलून वाक्चातुर्याने संसद गाजविणारे धडाडीचे नेतृत्व म्हणजेच शिवसेनेचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे होत.

Mandal's worker, business councilor, leader of the MPs | मंडळाचा कार्यकर्ता, व्यावसायिक नगरसेवक, नेता ते खासदार

मंडळाचा कार्यकर्ता, व्यावसायिक नगरसेवक, नेता ते खासदार

Next

- विश्वास मोरे 

अभ्यासपूर्ण सुसूत्रपणे, मुद्देसूदपणे बोलून वाक्चातुर्याने संसद गाजविणारे धडाडीचे नेतृत्व म्हणजेच शिवसेनेचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे होत. गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता सलग पाच वेळा नगरसेवक, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता ते दोन वेळा खासदार असा बारणे यांचा आलेख आहे. सामाजिक, शिक्षण, राजकारण, सहकार क्षेत्रात बारणे यांनी ठसा उमटविला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील बारणे यांनी वडिलांकडून समाजकारणाची, तर मोठे बंधू हिरामण यांच्याकडून राजकारणाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल केली. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यूथ काँग्रेसमध्ये काम, अजित पवार अध्यक्ष असताना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. प्रश्नांच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणे ही अमित बारणे यांची खासियत मानावी लागेल. स्पष्टवक्ते; परंतु कायम डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून वावरत असतात. आपल्या जीवनाच्या प्रारंभीच्या काळात वीटभट्टी आणि शेतीची व्यवसाय करणाऱ्या बारणे नंतर पिंपरी-चिचंवड महापालिकेत, राज्यात आणि देशातील राजकारणात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. गेल्या पाच वर्षांतील संसदेतील कामाची पावती म्हणून त्यांना सलग पाच वर्षे पार्इंट फाउंडेशनचा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. शिवसेनेच्या गोटात संसदेत सर्वाधिक विषयावर बोलणारा नेता अशीही ओळख झाली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बारणे यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. आपल्या कुटुंबाच्या पारंपरिक शेती आणि वीटभट्टी व्यवसाय वाढविला. व्यवसाय करताना विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम केले. राजकारणात प्रवेश केला. तसेच एनएसयूआय, काँग्रेस, शिवसेना अशा विविध राजकीय पक्षांत काम करून बारणे यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
>श्रीरंग बारणे
शिवसेना (मावळ), वय ५५
शिक्षण : दहावी. पत्नी सरिता, मुलगा विश्वजित, प्रताप. शिवसेना सक्रिय कार्यकर्ता, बांधकाम व्यावसायिक, शेती, बॅकिंग, शिक्षण. छत्रपती क्रीडा मंडळ (अध्यक्ष), पिंपरी-चिंचवड सोशल क्लब (अध्यक्ष), केंद्र सरकार संरक्षण स्थायी
समिती, राज भाषा समिती, सल्लागार समिती पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य
>चुकीच्या गोष्टींवर आक्रमक
महापालिकेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावत असताना पाण्याचा, महापालिकेतील निकृष्ट दर्जाची कामे, आरोग्याचा बोजवारा, पेपरफुटी प्रकरण, नदीपात्रातील बांधकामे, बोगस गुंठेवारी आदी प्रकरणे चव्हाट्यावर आणली. तसेच संसदेत काम करीत असताना जनतेच्या प्रश्नांवर आग्रही भूमिका मांडली आहे.
>क्रीडा, कला, सहकार, शिक्षण क्षेत्रातही...
व्यंकटेश्वरा नागरी सहकारी पतसंस्था, श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापन करून सहकार क्षेत्रात काम करीत आहेत. लक्ष्मीबाई बारणे शाळेत सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा थेरगाव येथील डांगे चौकात उभा केला. शहरातील पहिली क्रिकेट अकादमी ‘दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी’ सुरू करून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या हस्ते उद्घाटन करून क्रीडा चळवळीत भर टाकण्याचे काम केले. तसेच पाच एकर जागेवर शहरातील पहिला बोट क्लब थेरगाव येथे सुरू केला. शहरातील पहिला डांगे चौक ते चिंचवड असा सिमेंटचा रस्ता निर्माण केला. तसेच पिंपरी-
चिंचवड सोशल क्लबच्या माध्यमातून
काम केले.
>पवारांचा गड उद्ध्वस्त २०१९च्या निवडणुकीत बारणे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. सव्वादोन लाख मते मिळवून ते विजयी झाले असून, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या तिसºया पिढीचा पराभव केला आहे. पवारांचा पराभव करून जायंट किलर ठरले आहेत. शिवसेना आणि भाजपातील काही नगरसेवकांनी विरोधी भूमिका घेतली असतानाही पवारांचा गड उद्ध्वस्त केला आणि ताकद असल्याचे दाखवून दिले आहे.
>१९९७ मध्ये काँग्रेसकडून पहिल्यांदा महापालिकेवर निवडून आले. काँग्रेसचे बहुमत नसतानाही बारणे एक मताने स्थायी समिती अध्यक्ष झाले. संघटनात्मक काम पाहून काँग्रेस नेतृत्वाने २००४ मध्ये शहर काँग्रेस समिती अध्यक्षपदी निवड केली. संघटनेत न्याय मिळत नाही, म्हणून बारणे यांनी राजीनामा दिला. २००९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.महापालिकेच्या २०१२च्या निवडणुकीत चार नगरसेवक असणाºया पक्षाचे १४ नगरसेवक केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी. संसदेतील उत्कृष्ट कामगिरी म्हणून त्यांना सलग पाच वर्षे संसदरत्न पुरस्कार. पिंपरी आणि पनवेलमध्ये पासपार्ट केंद्र, क्रांतिवीर चापेकरबंधूंचे टपाल तिकीट, पुणे-लोणावळा लोहमार्ग रुंदीकरण, माथेरान रेल्वे पुनरुज्जीवन, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र विकास.

Web Title: Mandal's worker, business councilor, leader of the MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.