मांडवगणला ४६ एकर ऊस खाक
By admin | Published: October 19, 2015 01:56 AM2015-10-19T01:56:27+5:302015-10-19T01:56:27+5:30
विजेच्या मुख्य लाइनच्या तारा तुटून येथील ४६ एकर ऊस खाक झाला. ही घटना आज (दि. १८) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली
मांडवगण फराटा : विजेच्या मुख्य लाइनच्या तारा तुटून येथील ४६ एकर ऊस खाक झाला. ही घटना आज (दि. १८) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तारांच्या ठिणग्या ऊसावर पडून आगीने रौद्ररूप धारण केले. गांधीलमाश्यांमुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत होते. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात शेतकऱ्यांना यश आले.
आगीत शेतकरी जगन्नाथ शितोळे यांचा ४.५ एकर, नामदेव शितोळे यांचा दीड एकर, एकनाथ शितोळे यांचा दीड एकर, लंकाबाई चकोर यांचा सव्वातीन एकर, मंगल शितोळे साडेतीन एकर, सुशीला फराटे यांचा साडेतीन एकर, विश्वंभर फराटे यांचा साडेतीन एकर, विठ्ठल नागवडे यांचा साडेचार एकर, बाबासाहेब नागवडे यांचा साडेचार एकर, संजय फराटे यांचा दीड एकर, अलका फराटे यांचा सव्वा एकर, शरद फराटे यांचा अडीच एकर, दशरथ फराटे यांचा पाच एकर, यशोदा फराटे यांचा तीन एकर, आंनदराव फराटे यांचा पावने तीन एकर असा एकूण ४६ एकर ऊस जळून खाक झाला आहे.
शेतामध्ये वीजेचे खांब वाकलेल्या अवस्थेत आहेत. दोन खांबामधील तारा लोंबकळल्यामुळे हवेच्या प्रवाहाने या तारांचे घर्षण होऊन ऊसाला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन महिन्यांपूर्वी ६ एकर ऊस जळाला होता; त्याचप्रमाणे इनामगाव येथे २६ एकर ऊस जळीत झाला होता. जुनामळा येथे शेतमजुराची झोपडी व संसारउपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या.
महावितरणने या तारा ओढून घ्याव्यात, अशी मागणी वारंवार येथील शेतकरी करत आहेत. पंरतु या मागणीकडे नेहमी दुर्लक्ष होत आहे. त्वरित जळालेल्या ऊसाची भरपाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे. जळालेल्या ऊसाचा पंचनामा तलाठी अमोल कडेकर, कोतवाल भाऊसाहेब खोमणे, कृषी सहायक बाळासाहेब फराटे, जयनुद्दीन सय्यद यांनी घटनास्थळी केला. (वार्ताहर)