मंगलाष्टकांची वरात शाही वेदीवर

By Admin | Published: April 17, 2017 06:36 AM2017-04-17T06:36:12+5:302017-04-17T06:36:12+5:30

प्रत्येकाला आपला लग्नसोहळा वेगळा व्हावा, असे वाटत आहे. त्यामुळे घरापुढील लग्न मांडव... कार्यालय... लॉन्स आणि पंचतारांकित हॉटेल असा

Mangalaktakara on the imperial altar | मंगलाष्टकांची वरात शाही वेदीवर

मंगलाष्टकांची वरात शाही वेदीवर

googlenewsNext


पुणे : प्रत्येकाला आपला लग्नसोहळा वेगळा व्हावा, असे वाटत आहे. त्यामुळे घरापुढील लग्न मांडव... कार्यालय... लॉन्स आणि पंचतारांकित हॉटेल असा पोहोचला आहे. आम्हाला काही नको मात्र लग्न अमुक ठिकाणी हवे... भोजन असे हवे... अशी साधी मागणी बघता बघता लग्न सोहळ््याचे स्वरुप घेते, इतके केले... याला काय होतेय, असे म्हणत वधूपित्याकडील लगीनघाई लाखो रुपयांचा चुराडा करून जाते, याचे भानच राहत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

दोन महिने लगीनघाईचे आहेत. आपली उपस्थिती हाच आहेर, असे म्हणणाऱ्या लग्नाचा थाट पाहण्यासारखाच असतो. अलीकडे हुंडाबंदी आणि त्यावर खूप बोलले जात असल्याने हुंडा आम्ही घेणार नाही आणि देणार नाही, असे सांगणारे कुटुंब आता कमी नाहीत. मात्र, हुंड्यावर पाणी सोडत असले तरी वरपित्याकडील मागण्या या आडमार्गाने वधूपित्याच्या मानगुटीवर बसत आहेत. अनेकदा आम्हाला काही नको, मुलीला दहा तोळे सोने घाला (स्त्रीधन) अशी मागणी होते. काही जण लॉन्सचा आग्रह धरतात. त्यामुळे मंडपाचे कार्यालय आणि साध्या कार्यालयाचा मोठा हॉल आणि हॉलमधून लग्नवेदिका लॉन्स अथवा पंचतारांकित उंबरठा पार करून पुढे जात आहे.
वराकडील लोकांनी हुंडा म्हणून रोख मागितली नाही, की सोने मागितले नाही. याचा आनंद मानून वधूकडील मंडळी लग्नाला तयार होत असली तरी या मोठ्या लग्नापायी येणारा खर्चही वाढत जातो. मंडपाचा काही हजारांचा खर्च कार्यालयात हजारोंमध्ये जातो, तर लॉन्सचा खर्च लाखांचा आकडा पार करून सहजच जातो. कार्यालय अथवा लॉन्स जर मोठे घेतले तर त्याची सजावट आणि त्याला साजेसे भोजन ओघानेच येते. त्यामुळे बुंदी-जिलेबीची रसमलाई होते. त्यातून खर्चही त्याचपटीत वाढत जातो. त्यामुळे या थाटामाटातून येणारा खर्च थेट मागितलेल्या हुंड्यापेक्षादेखील अधिकच असतो. पुन्हा लग्न मोठे केले तर नातेवाईकांचा मान-पान, जावई सन्मान शाही हवाच. त्यामुळे हा अप्रत्यक्ष हुंडाच वधूपित्यासाठी ओझे ठरत आहे. (प्रतिनिधी)

भपकेबाज सोहळ्यांविरुद्ध चळवळ
मराठा वधू-वर विवाह संस्था चालविणारे विराज तावरे म्हणाले, की वर पक्षाच्या अपेक्षा पाहिल्या, की त्यांच्या पूर्ततेसाठी किती खर्च येत असेल, याचा विचार करवत नाही. त्यामुळे या भपकेबाज लग्न सोहळ््यांविरोधात चळवळ उभारली जाणार आहे. माझ्या लग्नाच्या वेळीदेखील मला हा प्रश्न सतावत होता. मी माझ्या भावी पत्नीच्या केतकी मानकर हीच्याशी विचारविनिमय करून साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कुटुंबीयांना पटवून देऊन तो अमलातही आणला.


सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण सातत्याने आकुंचन पावत असले तरी प्रत्येकाला अजूनही सरकारीच जावई हवा असल्याचे चित्र आहे. मुली मात्र आपल्याइतकाच बहुधा अधिक शिकलेल्या मुलालाच जीवनसाथी म्हणून पसंत करीत आहेत. मुलगी दुहेरी पदवीधर असेल आणि मुलगा एक पदवीधर असला तरी मुली असे स्थळ नाकारत आहेत. प्रत्येकालाच सुस्वरुप साथीदार हवा असतो. याशिवाय स्वत:चे घर, निर्व्यसनी, चांगली नोकरी अशा सर्वसाधारण अपेक्षा असतात. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे कार्यालय ते लॉन्स या ठिकाणी लग्न करून द्या, अशी मागणी केली जाते. हुंड्याऐवजी आता चांगले कार्यालय (शक्यतो लॉन्स) आणि चांगले भोजन अशी मागणी वाढत आहे. मुलांपेक्षा मुलींच्या नावांची नोंदणी करण्याचे प्रमाण अधिक आहे. आधी घरातील मुलीचे लग्न उरकावे, अशी भावना यामागे असते. विशेष म्हणजे व्यवसायाऐवजी चांगली नोकरी करणारा जावईच अनेक जण पसंत करतात, असे निरीक्षण अण्णाभाऊ साठे वधू-वर मंडळाचे दादासाहेब सोनवणे यांनी नोंदविले.

Web Title: Mangalaktakara on the imperial altar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.