महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, नागरिकाच्या प्रसंगावधानाने चोरट्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 02:36 AM2017-09-09T02:36:39+5:302017-09-09T02:36:51+5:30
दुकानात सिगरेट आणि पाणी मागण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले.
पुणे : दुकानात सिगरेट आणि पाणी मागण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. मात्र चोर पळून जात असताना एका नागरिकाने प्रसंगावधान राखून त्याला पकडले. ही घटना बी.टी. कवडे रस्त्यावरील प्रभू सुपर शॉपीमध्ये दुपारी ३.४५ वाजता घडली. त्याच्यासह साथीदाराविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सतीश गवळी असे अटक केलेल्याचे तर दिनेश गोपाळ गनोरे (वय ३२, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. २३ वर्षीय महिलेने (रा. घोरपडी) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे प्रभू सुपर शॉपी नावाचे दुकान आहे. दिनेश गनोरे याने दुकानात जाऊन फिर्यादी यांना सिगरेट व पाण्याची बाटली मागण्याच्या बहाण्याने फिर्यादी बिलाचे पैसे घेत असताना त्यांच्या गळ्यामध्ये हात घालून सोन्याचे ३0 हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेतले. दुकानाबाहेर मोपेड गाडीवर थांबलेला त्याचा जोडीदार सतीश गवळी याच्या पाठीमागे बसून पळून जात असताना फिर्यादी यांनी आरडाओरड केल्यानंतर रूबेन फ्रँकलिन हिरेकरू (ढोबरवाडी घोरपडी) याने गाडीवरून पळून जाणाºया दोघांचा पाठलाग केला आणि त्याने दिनेश गणोर याला पकडून ठेवले. मात्र दुसरी व्यक्ती गाडीवरून पळून गेली. सतीश गवळी याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पी. एल. गिरी पुढील तपास करीत आहेत.