लक्ष्मी रस्त्यावरून मंगळसूत्रचोर तासात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:17 AM2021-08-18T04:17:13+5:302021-08-18T04:17:13+5:30
पुणे : लक्ष्मी रस्ता सायंकाळच्या वेळी गजबजलेला असताना दुचाकीच्या डिकीमधून सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या चाेरट्यास फरासखाना पोलिसांनी एका तासात ...
पुणे : लक्ष्मी रस्ता सायंकाळच्या वेळी गजबजलेला असताना दुचाकीच्या डिकीमधून सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या चाेरट्यास फरासखाना पोलिसांनी एका तासात पकडले. त्याच्याकडून चोरलेले मंगळसूत्र जप्त केले.
बाबा लक्ष्मण बनपट्टे (रा. वडारवाडी, माॅडेल कॉलनी) असे या चोरट्याचे नाव आहे. बनपट्टे हा भुरटा चोर असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
फिर्यादी यांनी त्यांच्या पत्नीचे ११ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुरुस्त करुन त्यांच्या दुचाकीच्या डिकीत ठेवले. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी ही दुचाकी लक्ष्मी रोडवरील विजयराज लाॅजसमोर रस्त्यावर पार्क केली. त्यानंतर ते मुलीला कपडे घेण्यासाठी तुळशीबागेत गेले होते. दरम्यान, चोरट्याने त्यांच्या दुचाकीमधून मंगळसूत्र चोरून नेले. फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग व त्यांचे सहकारी चोरट्याचा शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषणावरून ही चोरी बाबा बनपट्टे याने केल्याची माहिती मिळाली. त्यावरून मनोज अभंग, पोलीस अंमलदार संदीप कांबळे, समीर माळवदकर, अभिनय चौधरी हे शोध घेत असताना बुधवार पेठेतील बाटा गल्लीत बाबा बनपट्टे त्यांना आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीला गेलेले मंगळसूत्र मिळून आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील करीत आहेत.