‘फुलेंच्या कार्याचं महत्त्व कमी करून आपल्या पूर्वजांचं महत्त्व वाढवणं योग्य नाही’ उदयनराजेंच्या वक्तव्यावर ओबीसी नेत्याचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:13 IST2025-04-11T12:10:28+5:302025-04-11T12:13:29+5:30

- महात्मा फुले जयंतीच्या दिवशी उदयनराजेंच्या वक्तव्यावरून वाद पेटला; ओबीसी नेते मंगेश ससाणे यांची तीव्र प्रतिक्रिया

mangesh sasane OBC leaders angered over Udayanraje bhosale statement, 'It is not right to reduce the importance of Mahatma Phule's work and increase the importance of our ancestors' | ‘फुलेंच्या कार्याचं महत्त्व कमी करून आपल्या पूर्वजांचं महत्त्व वाढवणं योग्य नाही’ उदयनराजेंच्या वक्तव्यावर ओबीसी नेत्याचा संताप

‘फुलेंच्या कार्याचं महत्त्व कमी करून आपल्या पूर्वजांचं महत्त्व वाढवणं योग्य नाही’ उदयनराजेंच्या वक्तव्यावर ओबीसी नेत्याचा संताप

पुणे - महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात उदयनराजेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवला आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले, "एका दृष्टीकोनातून पाहिलं तर महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जर कोणी सर्वप्रथम पाऊल उचललं असेल, तर ते प्रतापसिंह महाराज होते. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरु केली होती. विशेष म्हणजे, याच राजवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं."

या वक्तव्यावर ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, उदयनराजेंचं वक्तव्य मी तीन-चार वेळा ऐकलं. ते फुले वाड्यावर आले, त्याचा आदर आहे. पण महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी येऊन त्यांच्या कार्याचं महत्त्व कमी करून आपल्या पूर्वजांचं महत्त्व वाढवणं योग्य नाही. ससाणे म्हणाले, महात्मा फुलेंनी १ जानेवारी १८४८ साली पहिली मुलींची शाळा सुरू केली. यावर उदयनराजेंना आक्षेप का आहे? त्यांनी जर नवा इतिहास शोधून काढला असेल, तर आतापर्यंतचे सर्व संशोधक आणि इतिहासतज्ज्ञ फेल ठरवले का?

ते पुढे म्हणाले, प्रतापसिंह महाराजांनी शाळा सुरू केली असं म्हणता, तर त्या शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या? पुढे ती शाळा का टिकली नाही? उदयनराजेंनी आपल्या वंशज म्हणून तो शैक्षणिक वारसा पुढे का नेला नाही?  याचबरोबर ससाणे यांनी महात्मा फुलेंनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पोवाड्याची आठवण करून दिली. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं संपूर्ण महाराष्ट्राला महत्त्व आहे. पण आज फुलेंच्या कार्याचं महत्त्व कमी करायचा प्रयत्न धक्कादायक आहे, असं ते म्हणाले. महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने फुलेंच्या कार्यावर प्रकाश टाकण्याऐवजी त्यांच्या योगदानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Web Title: mangesh sasane OBC leaders angered over Udayanraje bhosale statement, 'It is not right to reduce the importance of Mahatma Phule's work and increase the importance of our ancestors'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.