आंबा तिपटीने घसरला
By admin | Published: May 14, 2015 04:27 AM2015-05-14T04:27:38+5:302015-05-14T04:27:38+5:30
फळांचा राजा अर्थात आंब्याचा दरवळणारा गंध आता पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये येत आहे. हातगाड्या, तसेच शहरभरातील चौकाचौकांत
पिंपरी : फळांचा राजा अर्थात आंब्याचा दरवळणारा गंध आता पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये येत आहे. हातगाड्या, तसेच शहरभरातील चौकाचौकांत आंब्याचे स्टॉल तसेच आंबा महोत्सव सुरू आहेत. परिणामी आवाक्याबाहेर असणाऱ्या आंब्याच्या खरेदीसाठी शहरवासीयांची झुंबड उडाली आहे.
या वर्षी अनेकदा कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे नुकसान झाले. परिणामी सुरुवातीला हापूस आंबा मंडईत १४ डिसेंबर रोजी दाखल होताच त्याचा प्रतिडझनाचा भाव ९०० रुपये (प्रतिकिलोस ५०० रुपये) राहिला. मात्र आता आंब्याचा हंगाम जोरावर आहे. कोकणपट्ट्यातील देवगड, रत्नागिरी या भागातील अस्सल हापूस आंब्याने बाजारपेठ सजली आहे. त्यातच इतरही प्रकारच्या आंब्यांचे पर्याय ग्राहकांपुढे उपलब्ध झाल्याने हापूससह सर्वच आंब्यांचे दर आता नियंत्रणात आले आहेत. या संधीचा फायदा घेत ग्राहकांनी शक्य तितके आंबे खरेदी करून आमरसाचा बेत आखला आहे.
सुरुवातीला हापूसचा प्रतिकिलोचा दर ४५० ते ५०० रुपयांपर्यंत होता. साध्या तोतापुरी आंब्याचीही विक्रमी १२० रुपयांनी विक्री व्हायची. या वेळी इतर आंब्यांचे फारसे पर्याय नव्हते. त्यामुळे आंबा खाणे धनिकांव्यतिरिक्त इतरांच्या आवाक्याबाहेर होते. दरम्यान, अक्षय तृतीयेपासून कोकणातून पायरी, लालबाग, दक्षिण भारतातून बदाम आणि बेंगलोर हापूस हे पर्याय उपलब्ध झाले. मल्लिका, मलगो अशा आंब्यांचे पर्याय मिळाले आहेत. त्यातच मागील पंधरा दिवसांपासून शहरभरात पिंपरीगाव, चिंचवड, पिंपळे गुरव, निगडी, प्राधिकरण, भोसरी, चिखली आदी भागात थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचण्यासाठी दुकाने थाटली आहेत. आंबे फ्रिजमध्ये ठेवू नयेत अशी माहिती व्यापारी कुमार शिरसाट यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)