आंब्याला ब्रिटनमधून मोठी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:11 AM2021-04-03T04:11:14+5:302021-04-03T04:11:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : युरोपीयन आघाडीतून ग्रेट ब्रिटन बाहेर पडल्याने त्यांचे आयात मालाचे नियम शिथील झाले. त्यामुळे तिथून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : युरोपीयन आघाडीतून ग्रेट ब्रिटन बाहेर पडल्याने त्यांचे आयात मालाचे नियम शिथील झाले. त्यामुळे तिथून भारतीय आंब्याला मोठी मागणी येत आहे. साताऱ्यातून ६ टन केशर आंबा नुकताच ब्रिटनला रवाना झाला आहे.
कोरोना काळात देशोदेशीचे आयातनिर्यात निर्बंध कडक झालेले असतानाही भारतीय आंबा विदेशात जोर धरून आहे. निर्यातीसाठी देशातून ३३ हजार ५५३ आमरायांची ३१ मार्चअखेर नोंद झाली. त्यातल्या ११ हजार ९५९ आमराया महाराष्ट्रातील आहेत. त्यातही रत्नागिरी हापूसच्या आमरायांची संख्या ७ हजार ९० आहे. त्या खाल़ोखाल २००७ इतकी रायगडमधील आमरायांची संख्या आहे.
ही नोंदणी आता थांबवण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या सर्व आंबा उत्पादकांंना विदेशातील बाजारपेठांची माहिती तसेच तिथे आपले उत्पादन टिकवण्यासाठी काय करावे लागते, माल कसा पाठवावा लागतो, त्यासाठी काय करायचे याची माहिती दिली जाते. त्यामुळेच यंदाच्या नोंदणीला विक्रमी प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.
युरोपीय आघाडीतील सर्व देशांचे आयातीसंबधीचे निर्बंध कडक होते. मात्र आता ब्रिटन या आघाडीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्यांचे आयातीचे निर्बंध शिथील झाले. तिथे बऱ्याच वर्षांपासून भारतीय हापूस, केशर आंब्याला पसंती आहे. निकष कडक असल्याने मागील काही वर्षात मागणी कमी झाली होती. आता मात्र तिथून मागणी वाढली आहे. इंग्लंड शिवाय सर्व अरब देश आणि बांगला देशातही भारतीय आंब्याला मागणी वाढली असल्याचे राज्याचे कृषी विभागाचे निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले.