‘ठाकरे’पेक्षा ‘मणिकर्णिका’चाच बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 02:20 AM2019-01-29T02:20:52+5:302019-01-29T02:21:24+5:30

‘मणिकर्णिका’ या चित्रपटाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला जमवला.

Manikarnika is better than 'Thackeray' | ‘ठाकरे’पेक्षा ‘मणिकर्णिका’चाच बोलबाला

‘ठाकरे’पेक्षा ‘मणिकर्णिका’चाच बोलबाला

googlenewsNext

पुणे : ‘शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि १८५७च्या ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी राणी लक्ष्मीबाई ही महाराष्ट्रातील दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्व ‘ठाकरे’ आणि ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झाँसी’ चित्रपटांद्वारे एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. परंतु, प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर ‘ठाकरे’पेक्षा ‘मणिकर्णिका’चाच अधिक बोलबाला पाहायला मिळाला. ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला जमवला.

लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव हे मणिकर्णिका तांबे. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील. त्यांचे वडील हे पुण्यात पेशव्यांकडे होते. लग्नानंतर झाशी संस्थानाच्या त्या राणी झाल्या, तर प्रबोधनाची परंपरा असलेल्या घरात जन्मलेले बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसेना’ पक्षाची स्थापना करून राजकारणासह व्यंगचित्र क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे मराठी मातीशी संबंधित आहेत. त्यामुळे ‘ठाकरे’ आणि ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झाँसी’ या दोन चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स आॅफिसवर गर्दी खेचण्यात यशस्वी ठरणार? याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता होती. ‘ठाकरे’ हा चित्रपट १६ देशांतील २,००० चित्रपटगृहांमध्ये, तर ‘मणिकर्णिका’ ५० देशांतील २,९०० चित्रपटगृहांत प्र्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी ‘ठाकरे’ या चित्रपटाने ६ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर शनिवार व रविवार या दोन दिवसांमध्ये या चित्रपटाने अनुक्रमे १०-१० कोटींचा व्यवसाय केला. ‘ठाकरे’ हा चित्रपट केवळ मराठी अस्मितेशी निगडित असल्याने मराठी रसिकांचा या चित्रपटाकडे कल अधिक दिसून येत आहे. महाराष्ट्राबाहेरील लोकांनी ‘ठाकरे’ या हिंदी भाषेतील चित्रपटाला तुलनेने फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याची चर्चा आहे. त्या तुलनेत हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेतील ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झाँसी’ चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून बॉक्स आॅफिसवर स्वत:चे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रदर्शनानंतर तीनच दिवसांत या चित्रपटाने ४२.५५ कोटींचा गल्ला जमवला आहे. समीक्षक तरुण आदर्श यांनी ट्विटरवर हे आकडे प्रसिद्ध केले आहेत.
पुण्यातही गेल्या तीन दिवसांत ‘ठाकरे’पेक्षा ‘मणिकर्णिका’ चित्रपटाला रसिकांची अधिक पसंती आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाचा पहिला शो पुण्यात शिवसेनेच्या वतीनेच आयोजित करण्यात आला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर रसिकांच्या पदरी निराशाच पडली. अनेक प्रसंग तुकड्यातुकड्यांमध्ये दाखविण्यात आल्याने युवा पिढीची चित्रपटाशी विशेष नाळ जुळली नसल्याचे बोलले जात आहे.

‘ठाकरे’ चित्रपट भावलाच नाही...
‘ज्या व्यक्तिमत्त्वाचे विचार भावलेले असतात तेव्हा ती भूमिका तो कलाकार खूप आत्मीयतेने करू शकतो. नवाझुद्दीन सिद्दीकी याने त्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केलेला नाही, हे त्याच्या बोलण्यातून अनेकदा जाणवत होते. संजय राऊत यांनी बाळासाहेबांचे दाखविलेला फोटो आणि यू ट्यूबवरून ऐकलेली भाषणे किंवा क्लिपिंग्स यावरून पात्राचा अभ्यास होऊ शकत नाही. बाळासाहेबांनी काय काम केले आहे हे जोपर्यंत वाचत नाही, तोपर्यंत ती भूमिका साकारू शकत नाही. दसऱ्याच्या मेळाव्यात भाषण करणारे बाळासाहेब आणि मातोश्रीत त्यांच्यासमवेत कलाकारांच्या रंगणाºया चर्चा या खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे ‘ठाकरे’ हा चित्रपट भावलाच नाही. पटकथा, संवादाच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही.
- योगेश सोमण, प्रसिद्ध रंगकर्मी आणि दिग्दर्शक

कंगनाचे सर्वत्र कौतुक...
‘मणिकर्णिका’ या चित्रपटाला करणी सेनेने केलेला विरोध, कंगनाने दिलेले प्रत्युत्तर, निर्मितीमध्ये आलेल्या अडचणी यांवर मात करीत तिने सहदिग्दर्शिका म्हणून चित्रपट काढण्याच्या केलेल्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. त्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांचा संघर्ष, त्यांचे शौर्य आणि कंगना राणावतचा अप्रतिम अभिनय पाहण्यासाठी रसिक ‘मणिकर्णिका’ला प्रतिसाद देत आहेत. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाचे पुण्यातले शो हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: Manikarnika is better than 'Thackeray'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.