रक्त नमुना बदल प्रकरणात फेरफार! CCTV फुटेज समोर; तावरे, हाळनोर, घटकांबळे कारागृहात
By नम्रता फडणीस | Published: June 7, 2024 07:52 PM2024-06-07T19:52:37+5:302024-06-07T19:55:34+5:30
बाल न्याय मंडळाच्या जवळील भागातच रक्त नमुना बदल केल्याप्रकरणातील आर्थिक व्यवहार झाल्याचे सीसीटिव्हीमधून निष्पन्न
पुणे : अल्पवयीन मुलाचे रक्त नमुना बदल केल्याप्रकरणातील आर्थिक व्यवहार बाल न्याय मंडळाच्या जवळील भागातच झाला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे आणि अमर गायकवाड यांना विशेष न्यायाधीश व्ही .आर. कचरे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली असून, चौघांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. मात्र अमर गायकवाड याची पोलीस कोठडीची मुदत १० तारखेला संपत आहे. हि पोलीस कोठडी अबाधित ठेवून त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील कारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा केल्या प्रकरणात डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांच्या वाढविण्यात आलेल्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी (दि. ७) संपल्याने त्या तिघांसह अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणात नव्याने अटक करण्यात आलेल्या अमर गायकवाड या चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याच्या गुन्हयात नव्याने अटक करण्यात आलेले अश्फाक बाशा मकानदार व अमर गायकवाड यांची पोलीस कोठडी मुदत दि. १० जून रोजी संपत आहे. मात्र, पोलिसांना अद्याप सीसीटीव्ही आणि मोबाईलचा विश्लेषणात्मक अहवाल प्राप्त झाला नसल्याने पोलिसांनी गायकवाडची पोलीस कोठडी अबाधित ठेवण्याची मागणी तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात केली. दरम्यान, गायकवाड याला मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे गायकवाड याच्या वकिलाने कोर्टात वैद्यकीय उपचारासाठी अर्ज केला आहे.
या अपघात प्रकरणातील तपासात मकानदार आणि गायकवाड दोघेही बांधकाम व्यावसायिक आरोपी विशाल अग्रवाल याच्या ब्रम्हा कन्स्ट्रक्शन मध्ये कमिशन एजंट म्हणून काम करत होते अशी माहितीही समोर आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.