पोलीस असल्याचे सांगून मणिपुरी विद्यार्थ्यास लुटले, मीरा हॉस्पिटलसमोरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 06:13 AM2017-09-03T06:13:52+5:302017-09-03T06:14:17+5:30
शंकरशेठ रस्त्यावर गणेश विसर्जनादिवशी खरेदीसाठी आलेल्या तीन मणिपुरी विद्यार्थ्यांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : शंकरशेठ रस्त्यावर गणेश विसर्जनादिवशी खरेदीसाठी आलेल्या तीन मणिपुरी विद्यार्थ्यांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मीरा हॉस्पिटलसमोर घडली. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीमुद्दिन आझम खान (वय १९, रा. भवानी पेठ, मूळ- मणिपूर) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान व त्याचे मित्र लुचिंग्वा सिंग निगथॉव्जम व थौडाम विकाश सिंग शिक्षणासाठी पुण्यात आले आहेत. पूना कॉलेजमध्ये बीएच्या पहिल्या वर्षाला ते शिकतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी खान व त्याचे मित्र सिम्बायोसिस कॉलेजसमोर मणिपुरी नृत्य करणार आहेत. त्यासाठी कपडे खरेदी करण्यासाठी खान व त्याचे दोन मित्र शंकरशेठ रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल या ठिकाणी जात होते. मीरा हॉस्पिटलसमोर आल्यानंतर दुचाकीवरून दोन व्यक्ती त्याच्याजवळ आल्या. त्यांना अडवून पोलीस असल्याची बतावणी केली. या घटनेत रोख रक्कम व मोबाईल असा २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
जवळच पोलीस दिसले. त्यांना हकिकत सांगितल्यावर त्यांनी कासेवाडी पोलीस चौकीत जाण्यास सांगितले. मात्र, तिथे पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे विद्यार्थी व संघटनेचे म्हणणे आहे.