मांजरेवाडी ते शिरोली पूल पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:07+5:302021-03-26T04:11:07+5:30
दावडी : मांजरेवाडी ते शिरोली या भीमा नदीपात्रावरील पुलाचे काम अखेर पूर्णत्वास गेले आहे. गेले दोन वर्षे पुलाचे काम ...
दावडी : मांजरेवाडी ते शिरोली या भीमा नदीपात्रावरील पुलाचे काम अखेर पूर्णत्वास गेले आहे. गेले दोन वर्षे पुलाचे काम ठप्प होते. पुलाचे काम पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना हा पूल जा-ये करण्यास खुला झाल्याने ग्रामस्थ आनंद व्यक्त करीत आहे.
मांजरेवाडी-शिरोली गावाला जोडणारा पूल भीमा नदीपात्रावर व्हावा, अशी मागणी कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांची होती.
मांजरेवाडी येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नदीपलीकडे आहेत. पूल नसल्याने शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेने दिलेल्या होडीचा वापर करावा लागत होता. दोन वर्षांपूर्वी भीमा नदीला पूर आल्याने होडीही पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे शेतकरी व महिलांना जीव मुठीत घेऊन नदीपात्रातून शेतकामासाठी जावे लागत होते. पावसळ्यात तर नदीला पाणी असल्याने शेतकऱ्यांना नदीपलीकडे जाता येत नव्हते. तसेच शेतकऱ्यांना शेतमाल ने- आण करण्यासाठी अडचणी सामना करावा लागत होता.
नागरिकांची गैरसाय होत होती ती गरज ओळखून मांजरेवाडीच्या सरपंच अनिता मांजरे, माजी उपसरपंच अशोक मांजरे, शिवसेना सेना शाखाप्रमुख बाळासाहेब मांजरे, ग्रामपंचायत सदस्य सतीश मलघे, विलास मांजरे, मनोहर मांजरे यांनी सांडभोरवाडी काळूस गटाचे जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मात्र पुलांचे कामाचे बजेट मोठे असल्याने बाबाजी काळे यांनी जिल्हा परिषद निधी माध्यमातून व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून पुलाचे काम हाती घेतले. काम सुरु असतानाच काही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे पुलाचे काम अर्धवट अवस्थेत होते.
मात्र, बाबाजी काळे यांनी पदरमोड करत ग्रामस्थांनी थोडा हातभार लावत पुलाचे काम पूर्णत्वास नेले आहे. भीमा नदीपात्रावर पूल तयार झाल्याने शेतकऱ्यांची होणारी अडचण दूर झाली आहे. शेतकऱ्यांना ये-जा करण्यास पूल सुलभ झाला असल्याचे सरपंच अनिता मांजरे यांनी सांगितले.
--
फोटो क्रमांक : २५ दावडी मांजरेवाडी ते शिरोली पूल पूर्ण
फोटो ओळ: मांजरेवाडी-शिरोली येथील भीमा नदीपात्रावरील पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीस खुला झाला आहे.