मांजरी रेल्वेगेटवर वारंवार वाहतूककोंडी; फाटक तुटण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:37 PM2018-01-10T12:37:15+5:302018-01-10T12:41:40+5:30
मांजरी बुद्रुक रेल्वे फाटक क्रमांक तीनमध्ये वारंवार बिघाड होण्याची तसेच वाहने धडकून फाटक तुटण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी सायंकाळी गेट बंद राहिल्याने प्रचंड वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.
मांजरी : मांजरी बुद्रुक रेल्वे फाटक क्रमांक तीनमध्ये वारंवार बिघाड होण्याची तसेच वाहने धडकून फाटक तुटण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी सायंकाळी चार ते आठ वाजण्याच्या सुमारास असाच प्रकारे गेट बंद राहिल्याने संध्याकाळच्या वेळी तसेच बुधवारी प्रचंड वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.
मांजरी बुद्रुक-वाघोली रस्त्यावर मांजरी बुद्रुक येथे रेल्वे गेट क्रमांक तीन आहे. सध्या या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. त्यातच नवीन बसविण्यात आलेल्या रेल्वे फाटकामध्ये वारंवार बिघाड होत आहेत. याशिवाय अवजड वाहने धडकून गेट तुटण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी सायंकाळी असेच गेट तुटल्याने वाहतूककोंडीचा सामना कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार, शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थी आणि इतर सर्व वाहन चालक यांना करावा लागला. येथे काही तास त्यांना अडकून पडावे लागले. रेल्वेगेटवर झालेल्या वाहतूककोंडीच्या रांगा एक किलोमीटर अंतरावर गेल्या होत्या. काही मिनिटांसाठी गेट उघडल्यानंतर रेल्वे रुळावरच मोठी गर्दी झाली होती. त्यात येणाऱ्या रेल्वेच्या आवाजाने नागरिक चांगलेच घाबरून गेले होते.
दररोजच्या रेल्वेच्या वाढलेल्या संख्येमुळे गेट बंद राहिल्याने ही वाहतूक मंदावत आहे. त्यामुळे रेल्वे फाटकाची कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी. येथे वाहतूक पोलीस नेमावेत तसेच फाटकाच्या दोन्ही बाजूला दुभाजक घालावेत, अशी मागणी यावेळी कोंडीत अडकलेले नागरिक करीत आहेत.