विद्यापीठात मंजुळेंच्या चित्रपटाचा सेट जैसे थे : प्रशासनाची केली दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 09:34 PM2018-04-18T21:34:02+5:302018-04-18T21:34:02+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना नाममात्र दरामध्ये शुटींगसाठी विद्यापीठाचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांना डिसेंबर पर्यंत मैदान वापरण्यास परवानगी दिली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही त्यांच्या चित्रपटाचे शुटींग झालेच नाही.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी गेल्या ७ महिन्यांपासून चित्रपटाचा सेट लावला आहे. याप्रकरणी कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर आपण सेट काढून घेत असल्याचे पत्र ३ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजुळेकडून विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र त्यानंतर दिड महिना उलटला तरी चित्रपटाचा सेट मैदानावर जैसे थे स्थितीत आहे. चित्रपटाचा सेट काढून घेत असल्याचे सांगून त्याच्याकडून प्रशासन व विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना नाममात्र दरामध्ये शुटींगसाठी विद्यापीठाचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांना डिसेंबर पर्यंत मैदान वापरण्यास परवानगी दिली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही त्यांच्या चित्रपटाचे शुटींग झालेच नाही. त्याचबरोबर हे मैदान मैदान भाडयाने देताना उच्च शिक्षण विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांची परवानगी घेण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. यापार्श्वभुमीवर नागराज मंजुळे यांना नोटीस बजावून ७ दिवसांच्या आत सेट काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतर दिड महिना उलटलला तरी त्यांनी सेट काढून घेण्याची काहीच कार्यवाही केली नव्हती.
मंजुळे यांनी ‘‘माझ्या हिंदी फिल्मचं शूटिंग काही तांत्रिक अडचणींमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभा असलेला सेट काढण्याचे काम सुरु झाले आहे. विद्यापीठाने केलेल्या सहकार्याबद्दल मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अत्यंत ऋणी राहीन.’’ अशी पोस्ट फेसबुक टाकून चित्रपटाचा सेट काढत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र केवळ सेट काढण्याचा दिखावा करून त्याने प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.
कुलगुरू आता तरी कारवाईला सामोरे जाणार का?
नागराज मंजुळे यांच्यासोबत बेकायदेशीरपणे करार करून विद्यापीठाने मैदान भाडयाने दिले. या बेकायदेशीर कराराची मुदत संपल्यानंतरही त्यांनी चित्रपटाचा सेट काढलेला नाही. याप्रकरणी मंजुळेंवर नियमानुसार मोठी दंडात्मक कारवाई होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मंजुळे यांना मैदान भाडयाने देण्याचा निर्णय सर्वस्वी आपला होता असे स्पष्टीकरण कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी यापुर्वीच दिले आहे. त्यामुळे कुलगुरू ही जबाबदारी स्वीकारून स्वत: कारवाईला सामोरे जाणार का, व्यवस्थापन परिषद त्यांना याबाबत जाब विचारणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
खेळाडूंची ससेहोलपट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विस्तीर्ण मैदान आहे. या मैदानातील निम्म्या भागात दुरूस्तीचे काम चालू आहे. उर्वरित भागात दररोज शेकडो खेळाडू विविध खेळांची तयारी करीत. या भागात गेल्या ७ महिन्यांपासून नागराज मंजुळेंच्या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला आहे. ४५ दिवसात हा सेट काढला जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अद्यापही सेट हलविला जात नसल्याने त्या खेळाडूंची मोठयाप्रमाणात ससेहोलपट होत आहे.