मंजुळेंचा चित्रपट सेट ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:14 AM2018-02-20T07:14:37+5:302018-02-20T07:14:46+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट लावण्यास परवानगी देण्यावर राज्य शासनाकडून गंभीर आक्षेप घेण्यात आला
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट लावण्यास परवानगी देण्यावर राज्य शासनाकडून गंभीर आक्षेप घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर त्यांना ७ दिवसांत सेट काढून घेण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिले होते; मात्र त्याला १२ दिवस उलटून गेले, तरी मैदानातील सेट हलविण्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन हतबल झाले आहे. आता शिक्षण संचालकांकडून याबाबत काय कार्यवाही केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
विद्यापीठातील मैदान नागराज मंजुळे यांना दीड महिन्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार डिसेंबरपर्यंत त्यांनी मैदान खाली करणे अपेक्षित होते; मात्र ४ महिने उलटले, तरी अद्याप चित्रपटाचे शूटिंग सुरूही झालेले नाही. त्याचबरोबर विद्यापीठाने नियमानुसार कुठलीही प्रक्रिया पार पाडली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून मैदान खाली करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार ८ फेब्रुवारी रोजी
कुलगुरूंनी तातडीने नागराज मंजुळे यांना नोटीसही बजावली; मात्र तरीही दिलेल्या मुदतीत मैदानातून चित्रपटाचा सेट हलविण्यात
आलेला नाही.
विद्यापीठाने मंजुळे यांना नोटीस बजावल्यानंतर त्यांनी विद्यापीठाला एक पत्र दिले आहे. त्यामध्ये सेट ठेवण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली आहे असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान कधी उपलब्ध होणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
नागराज मंजुळे यांना बेकायदेशीरपणे मैदान उपलब्ध करून देण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी झाल्यानंतर, याची जबाबदारी आपण स्वत: स्वीकारत असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यानुसार काहीच कृती झाल्याचे दिसून येत नाही.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विस्तीर्ण मैदान आहे. त्यापैकी निम्म्या भागातील मैदानावर दुरुस्तीची कामे सुरू आहेत. उर्वरित भागावर चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचा सेट उभारला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानाचा केवळ एक चतुर्थांश भाग उपलब्ध आहे. या मैदानावर विद्यापीठाबरोबरच अनेक महाविद्यालयातील खेळाडू सरावासाठी येत असतात.
नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाचे शूटिंग उरकल्यानंतर काही दिवसांत मैदान उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्या खेळाडूंना होती; मात्र ४ महिने उलटले, नोटीस बजावली तरी मैदान खुले होत नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. आता आणखी किती दिवस वाट पाहायची, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे.