‘मनोहर अंबानगरी’ची लघुपट महोत्सवात बाजी; आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:17 PM2018-02-01T12:17:19+5:302018-02-01T12:20:56+5:30
अंबाजोगाई परिसरातील विविध ऐतिहासिक मंदिरे, निसर्ग सौंदर्य व लेण्यांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख पुण्यातील राहुल नरवणे या तरुणाने लघुपटातून उलगडली आहे.
पुणे : अंबाजोगाई परिसरातील विविध ऐतिहासिक मंदिरे, निसर्ग सौंदर्य व लेण्यांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख पुण्यातील राहुल नरवणे या तरुणाने लघुपटातून उलगडली आहे. त्याच्या ‘मनोहर अंबानगरी’ या लघुपटाला या वर्षीच्या कंबोडिया येथे होणाऱ्या ‘एशिया साऊथ ईस्ट फिल्म फेस्टिव्हल’चा ‘आॅनरेबल अॅवॉर्ड’ जाहीर झाला आहे. ‘द आरकॉलॉजी चॅनेल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’नेही या लघुपटाची दखल घेतली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून ‘मनोहर अंबानगरी’ हा प्रकल्प सुरू आहे. हा लघुपट ‘इको फिल्म फेस्टिव्हल ब्रिक्स’च्या माध्यमातून मॉस्को, रशिया येथे दाखवण्यात आला. संस्कृती, इतिहास आणि पुरातत्त्वकदृष्ट्या अंबाजोगाईचे महत्त्व प्रचंड आहे. त्याच अंबाजोगाईची दखल आता लघुपटातून ‘द आरकॉलॉजी चॅनेल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ने घेतली आहे. याच महोत्सवामध्ये राहुल नरवणे याने केलेला ‘केदारेश्वर टेम्पल’ हा लघुपटही दाखवण्यात येणार आहे. उजनी (ता. अंबाजोगाई) येथील राहुल नरवणे यांनी पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून भारतीय विद्याशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. ‘मनोहर अंबानगरी’मध्ये अंबाजोगाईचे पंचमवेद अकादमीचे विनोद निकम, नृत्य कलावंत, नामदेव गुंडाळे यांनीही काम केले आहे. लघुपटाच्या टीममध्ये विश्वास कुलकर्णी, दत्ता अंकुशे, स्वप्निल जोशी, राहुल पोतदार याचा समावेश आहे.
‘मनोहर अंबानगरी’ आता अमेरिकेत दाखवण्यात येईल. ‘द आरकॉलॉजी चॅनेल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मधील कला, संस्कृती आणि इतिहास या विभागात ४५ देशांमधील ८०० फिल्ममधून ३० लघुपट दाखवण्यात येतील. ओरेगन राज्यातील युजीन शहरात महोत्सव २ ते ६ मे या कालावधीत होणार आहे.