मनोहरमामा भोसलेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:13 AM2021-09-17T04:13:45+5:302021-09-17T04:13:45+5:30
शशिकांत खरात (रा. साठेनगर, कसबा बारामती, ता. बारामती, जि. पुणे) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ...
शशिकांत खरात (रा. साठेनगर, कसबा बारामती, ता. बारामती, जि. पुणे) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तक्रारदार खरात यांचे वडलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले भोंदूबाबाच्या मौजे सावंतवाडी, गोजुबावी (ता. बारामती, जि. पुणे) मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. तक्रारदार यांच्या वडलांचा गळ्यावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिले. तसेच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकूण २ लाख ५१ हजार ५०० रुपये त्यांचे व त्यांचे वडलांचे जिवाचे बरे-वाईट होईल अशी भीती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे. पैसे परत मागीतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे.
या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी मनोहर मामाला शुक्रवारी (दि १०) सालपे (जि. सातारा) येथे फार्महाऊसवर जाऊन ताब्यात घेतले आहे. उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. त्यांना अटक करावयाची असून भोसले याच्याकडील गुन्ह्यातील रक्कम आणि अन्य बाबींचा तपास करावयाचा आहे. त्यामुळे त्याची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी सरकार पक्षाच्या वतीने ॲड.पी. एन. कुचेकर यांनी केली. त्यावर न्यायालयाने पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे. मनोहर भोसले याच्या वतीने ॲड. हेमंत नरुटे यांनी काम पाहिले. गुरुवारी (दि.१६) देखील न्यायालयाबाहेर मनोहरमामा भोसलेला पाहण्यासाठी त्याच्या समर्थक, भक्तांसह उत्सुकतेपोटी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
फोटो ओळी- बारामती न्यायालयाच्या आवारात मनोहरमामा भोसलेला पाहण्यासाठी गुरुवारी (दि. १६) त्याच्या समर्थकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
१६०९२०२१ बारामती ०१