Manohar Parrikar : पुण्यातून सहज निवडून आलो असतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:14 AM2019-03-18T03:14:20+5:302019-03-18T03:14:51+5:30
एक सच्चा प्रामाणिक नेता अशी पुणेकरांच्या मनात मनोहर पर्रिकर यांच्याविषयीची प्रतिमा होती. महाराष्ट्रात त्यांच्यासारखी कोणी राजकारणी व्यक्ती बघितली नाही, या भावनेतून पुणेकरांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर होता.
पुणे : एक सच्चा प्रामाणिक नेता अशी पुणेकरांच्या मनात मनोहर पर्रिकर यांच्याविषयीची प्रतिमा होती. महाराष्ट्रात त्यांच्यासारखी कोणी राजकारणी व्यक्ती बघितली नाही, या भावनेतून पुणेकरांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर होता. अनेकदा पुण्यात आल्यानंतर पुणेकर आवर्जून त्यांना भेटण्यासाठी जात असत आणि तेही पुणेकरांशी मनमोकळा संवाद साधत असत. त्यामुळे ते एकदा मिश्किलपणे म्हणाले होते, की पुणेकरांचे इतके माझ्यावर प्रेम आहे, की मी पुण्यात उभा राहिलो तरी सहज निवडून येईन, अशी आठवण लेखिका मनस्विनी प्रभुणे नायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.
मनोहर पर्रिकर यांचे पुण्याशी जुने ऋणानुबंध होते. गोव्याचे मुख्यमंत्री व्हायच्या आधीही ते अनेकदा कामाच्यानिमित्ताने पुण्यात येत असत. येथील एक बोहरी मुस्लिम त्यांचा बिझनेस पार्टनर होता. त्याला भेटण्यासाठी आणि क्लाएंट्सच्या भेटीगाठींसाठी ते वारंवार पुण्यात येत असत. त्यांना पुणे खूप आवडत असे. नंतर मुख्यमंत्री झाल्यावरही ते अनेकदा पुण्यात आले.
माझी त्यांच्याशी पहिली ओळख २००२ मध्ये झाली. बाबांचे मित्र यशवंत ठकार यांच्या सेंटर डेव्हलपमेंट आॅफ प्लॅनिंग अँँड रिसर्च या संस्थेच्या एका प्रोजेक्टवर काम करण्याची विचारणा झाली आणि मी गोव्यात गेले. एका सर्वेक्षणाचे काम त्यांनी आम्हाला दिले होते.
ते माझ्या वडिलांना (गिरीश प्रभुणे) संघाचे कार्यकर्ते म्हणून चांगले ओळखत होते. त्यांना माझ्या बाबांबद्दल प्रचंड आदर होता. पण सुरुवातीला कित्येक महिने मी प्रभुणेंची मुलगी आहे हे त्यांना सांगितलेच नव्हते. त्यांची मुलगी आपल्याकडे काम करीत आहे, हे कळल्यानंतर ते माझे एका अर्थाने पालकच झाले. उशीर झाल्यावर वडील कसे ओरडायचे, तसेच ते मला ओरडत असत. उशिरा एकटीने फिरू नको म्हणायचे. त्यामुळे माझे बाबाही निश्चिंत असत आणि गोव्यात एकटीला काम करतानाही त्यांना माझी चिंता वाटत नसे, कारण पर्रिकर काळजी घेतील, याची त्यांना खात्री होती.
पर्रिकर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून ते शेवटच्या टर्मपर्यंत मी त्यांच्यासोबत होते. मला २००२-१९ अशी तब्बल १७ वर्षे त्यांचा सहवास लाभला. त्यांच्या जवळपास सगळ्या निवडणुकांचे सर्वेक्षण, नियोजन, प्रचाराचे मुद्दे काय असले पाहिजेत, प्रचार मोहीम याच्यात मी सक्रिय सहभागी होते.
राजकारणात कोणी तरी विश्वासू व्यक्ती जवळ लागतो, तसा त्यांचा माझ्यावर आणि यशवंत ठकारकाकांवर प्रचंड विश्वास होता. अनेक गोष्टी ते आमच्याशी शेअर करायचे. कित्येकदा पुण्याला आले, की मुंबईपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत प्रवास करीत असू. जाताना वेगवेगळी चर्चा होत असे आणि मग मुंबईवरून परत येत असू. आज कुटुंबातीलच एक वडीलधारी व्यक्तीग् गमावली असल्याची भावना अस्वस्थ करत आहे. त्यांचे प्रेम हे मी कधीच विसरू शकत नाही.
चांगला मित्र गमावला
मनोहर पर्रिकर यांचे दु:खद निधन माझ्यासाठी धक्कादायक आहे. मी माझे नेता, पण अत्यंत चांगले मित्र गमावले आहेत. संघाचा निष्ठावंत स्वयंसेवक, आपल्या बुद्धिमत्तेचा राष्ट्रासाठी उपयोग व्हावा, अशी धारणा असलेले नेतृत्व, गोव्यात भारतीय जनता पक्षाचे मजबूत संघटन करणारा कुशल संघटक, गंभीर आजारी असताना काम करीत राहणारा लढवय्या देशभक्त नेता, बडेजाव नसलेलं राजकारणातील अत्यंत साधं व्यक्तिमत्त्व आणि समर्पित जीवन पर्रिकरांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेले आहे. माझ्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- अनिल शिरोळे, खासदार
संरक्षण खात्याला वेगळा आयाम दिला
मोदींच्या मंत्रिमंडळातील एक अतिशय प्रभावी मंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी काम केले. पर्रिकर यांनी केलेले काम
देश नेहमीच लक्षात ठेवेल. देशाचे
संरक्षणमंत्री असताना देशाच्या संरक्षण
खात्याला त्यांनी वेगळा आयाम दिला. अत्यंत उच्चशिक्षित असलेले पर्रिकर शांत व संयमी नेते होते. पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
- योगेश गोगावले,
अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर
शांत व निगर्वी व्यक्तिमत्त्व हरपले
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अतीव दु:ख झाले. संरक्षणमंत्री असताना त्यांनी देशहिताचे अनेक चांगले निर्णय घेतले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गोव्याचा विकास तर केलाच, पण पुण्याच्या विकासातही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पुण्याच्या विमानतळाचा विस्तारीकरणाचा निर्णय असो वा पुण्यातील विविध विकासकामांसंबंधी लागणाऱ्या लष्कराच्या परवानग्या देण्याचा निर्णय असो, अगदी विनाविलंब त्यांनी निर्णय घेतले. त्यांची जशी साधी राहणी होती, तसेच त्यांचे विचार उच्च होते. पर्रिकर भाजपाचा अभ्यासू चेहरा होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक होते. गंभीर आजारी असतानाही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाच्या आणि गोव्यातील जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतले. अशा या झुंजार व्यक्तिमत्त्वास माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
- गिरीश बापट, पालकमंत्री
माणसांत रमलेला नेता
गोव्याचे मुख्यमंत्री, कायम माणसांत रमलेला नेता, माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले. त्यांचे गोवा आणि देशासाठीचे योगदान अमूल्य आहे. त्यांची पोकळी नेहमीच जाणवेल. भावपूर्ण श्रद्धांजली.
- सुप्रिया सुळे,
खासदार
सुसंस्कृत राजकारणी गमावला
मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने सुसंस्कृत राजकारणी आपण गमावला. गोवा विधानसभेच्या सभागृहात त्यांनी माझ्या ‘सफेद टोपीमधील कविता सादर केल्या होत्या. मी काँग्रेसचा आमदार असूनही पर्रिकरांनी मला गोवा फिल्म फेस्टिव्हल कमिटीवर सदस्य म्हणून घेतले होते. त्यांची शेवटची भेट अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये झाली होती. मला व अशोक नायगावकरांना त्यांनी गोव्याचे निमंत्रण दिले होते. परंतु ते जमले नाही. यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, मनोहर पर्रिकर अशी माणसे कुठे शोधायची?
- रामदास फुटाणे
दूरदृष्टी असलेला नेता
मला चार संरक्षणमंत्र्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. पण देशाच्या संरक्षण सिद्धतेविषयी दूरदृष्टी असलेले एकमेव संरक्षणमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांच्याकडे पाहावे लागेल. ते संरक्षणमंत्री होण्यापूर्वी मुख्यमंत्री असताना ‘फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी’च्या गोव्यातील कार्यक्रमामध्ये आमची भेट झाली होती. तेव्हापासून मी त्यांना अत्यंत जवळून पाहत आलो आहे. त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा खूप वेगळी होती. संरक्षणमंत्री असताना देशाची संरक्षणाची स्थिती २०३५ मध्ये कशी हवी, यासाठी त्यांनी माझ्या अध्यक्षेतखाली समिती नेमली. २०१६ मध्ये समितीने अहवाल दिला. या अहवालात करण्यात आलेल्या ६० टक्के शिफारशींची त्यांनी लगेच अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे असा संरक्षणमंत्री देशाला पुन्हा मिळणार नाही. ते अत्यंत प्रामाणिक आणि कुशल नेते होते. भारतात असे नेते खूप आहेत. त्यांच्या निधनामुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे. त्यांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुणवत्तेचे किमान १० टक्के तरी अनुकरण केले पाहिजे.
- लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. बी. शेकटकर
देशाचा सक्षम नेता गेला
देशाचे सरंक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्याच आठवड्यात मला भेटण्यास बोलावले होते. त्यावेळी संरक्षणविषयक विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली. एका समितीच्या अध्यक्षपदीही त्यांनी मला नियुक्त केले होते. पर्रिकर यांना सर्वच गोष्टी सहज समजत होत्या. त्यांच्या रुपाने देशाला एक सक्षम नेता मिळाला, असे वाटत होते. परंतु, काही कारणास्तव त्यांना पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी जावे लागले. तेव्हा वाईट वाटले. पर्रिकर हे सक्षम आणि उभरते नेतृत्व होते. देशाच्या संरक्षण विभागाने अधिक सक्षम होणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल.
- भूषण गोखले, निवृत्त एअरमार्शल
भ्रष्टाचाराचा शिंतोडा नाही...
राजकीय क्षेत्रात राहूनदेखील स्वत:वर भ्रष्टाचाराचा एकही शिंतोडा उडु न देणारे व अत्यंत साधेपणा, सहज असलेले माझे परममित्र व मार्गदर्शक गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाचे वृत मनाला न पटणारे असून हे सत्य पचविणे अतिशय क्लेशकारक आहे. २०१४ च्या लोकसेभा निवडणुकीदरम्यान अनेक वेळा त्यांच्याशी संवाद झाला, त्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. त्यांच्यासारखा सरळ , स्वच्छ आदर्श नेता होणे नाही. राजकारणाच्या गटार-गंगेत राहूनदेखील त्यांनी आपले हात निर्मळ व स्वच्छ ठेवले. मनोहर पर्रिकर यांना स्वाभिमानी पक्षाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
- राजू शेट्टी, खासदार व संस्थापक-
अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना