Manoj Jarange Patil: पुण्यातील गुंजन चौक ते तारकेश्वर रस्त्यावर मराठ्यांचं वादळ
By श्रीकिशन काळे | Published: January 24, 2024 05:10 PM2024-01-24T17:10:23+5:302024-01-24T17:11:02+5:30
सायंकाळी ५ वाजता जरांगे पाटील गुंजन चौकात आले आणि मग तारकेश्वर चौकापासून गुंजन चौकापर्यंत नागरिकांची गर्दीच गर्दी झालेली पहायला मिळाली....
पुणे : बंडगार्डन येथे जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासूनच मराठा बांधव जमले होते. सायंकाळी ५ वाजता जरांगे पाटील गुंजन चौकात आले आणि मग तारकेश्वर चौकापासून गुंजन चौकापर्यंत नागरिकांची गर्दीच गर्दी झालेली पहायला मिळाली.
मराठा आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत. त्यांच्या सोबत लाखोंचा मराठा बांधव सहभागी झाला आहे. तारकेश्वर चौकात तर प्रचंड संख्येने बांधव उभे होते. केवळ जरांगे पाटील यांची झलक पहायला मिळावी हीच अनेकांची इच्छा होती. लहान लेकरांसह बायका जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आल्या होत्या. त्यात तरूणी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रत्येकाच्या डोईवर भगवी टोपी आणि त्यावर एक मराठा लाख मराठा असे लिहिलेले पहायला मिळाले.
अनेकजण मोठा भगवा झेंडा घेऊन सहभागी झाले होते. जय भवानी जय शिवरायचा सतत गजर होत होता. तारकेश्वर चौक ते गुंजन चौक भगव्या रंगाने भरून गेले होते. प्रत्येकाला जरांगे पाटील यांची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपायची होती. त्यासाठी अनेकजण घरांवर व इतर जिथे जागा असेल तिथे उभे राहत होते. जरांगे यांचा ताफा कित्येक किलोमीटरपासून दूर होता तरी लोकं पाहण्यासाठी हजर होते.