मराठा आरक्षणाचे भगवे वादळ राजधानीच्या वेशीवर; पुण्यात १० तास जरांगे-पाटलांची पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 08:14 AM2024-01-25T08:14:46+5:302024-01-25T08:14:58+5:30

नियोजित मुक्काम लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ येथे आहे. सभेसाठी १३० एकरचे, तर वाहनतळासाठी १५० एकरचे मैदान तयार करण्यात आले.

Manoj Jarange-Patil's padayatra, which went to Mumbai for Maratha reservation, continued for 10 hours in pune | मराठा आरक्षणाचे भगवे वादळ राजधानीच्या वेशीवर; पुण्यात १० तास जरांगे-पाटलांची पदयात्रा

मराठा आरक्षणाचे भगवे वादळ राजधानीच्या वेशीवर; पुण्यात १० तास जरांगे-पाटलांची पदयात्रा

पुणे: मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेली मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा बुधवारी शहरात १० तास सुरू होती. नागरिकांकडून होणारे स्वागत, बघ्यांची गर्दी यामुळे पदयात्रा निघालेल्या रस्त्याला पालखी यात्रेचेच स्वरूप आले होते. प्रचंड गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मात्र, रस्त्याची एक बाजू मोकळी ठेवून आंदोलक व त्यांची वाहने जात असल्यामुळे शिस्तीचेही दर्शन पुणेकरांना घडले. वाघोलीवरून सकाळी ११ वाजता निघालेली ही यात्रा रात्री ९ नंतर शहरातून लोणावळ्याकडे रवाना झाली. नियोजित मुक्काम लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ येथे आहे. सभेसाठी १३० एकरचे, तर वाहनतळासाठी १५० एकरचे मैदान तयार करण्यात आले.

घराघरांतून प्रत्येकी २५ चपात्या, चटणी
लोणावळा, मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ, कामशेत, वडगाव, तळेगाव या भागामधून घराघरांतून प्रत्येकी २५ चपात्या व चटणी तयार केली.   

‘ओबीसीत याल तर दोनच टक्के आरक्षण’ 
धाराशिव : कुणबी दाखल्यांच्या आधारे मराठा समाज जर ओबीसींचे आरक्षण घेणार असेल तर ते त्यांचेच नुकसान ठरणार आहे. हे आरक्षण घेतल्यास ईडब्ल्यूएसचा लाभ त्यांना घेता येणार नाही. रोहिणी आयोगामुळे  मराठा समाजाला या नऊ टक्क्यांतूनच जवळपास दोन टक्के आरक्षण मिळेल, असे मत माजी आ. प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केले.

पहिलीचा मित्र म्हणतो, मनोज पूर्वीपासूनच जिद्दी
पुणे : मनोज हा आधी शांत आणि हुशार विद्यार्थी होता. पाचवीनंतर तो जिद्दी झाला. शाळेतील विद्यार्थी संसद असो किंवा वर्गाचा मॉनिटर यामध्ये त्याचेच नाव असायचे. आजही त्याच्या जिद्दीचे प्रत्यंतर आंदोलनात दिसून येते. मातोरी (जि. बीड) गावातील साधारण कार्यकर्ता ते संपूर्ण मराठा समाजाचा चेहरा हा संपूर्ण प्रवास मनोज जरांगे यांचे लहानपणापासूनचे मित्र अशोक जरांगे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना उलगडला.

आम्ही महिनाभराचा शिधा घेऊन मुंबईकडे निघालो  
पिंपरी (पुणे) : ‘आम्ही वाहनांमधून महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य आणि साहित्य घेऊन निघालो आहोत. त्यात स्वयंपाकासह कपडे, चादरी यांचा समावेश आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण घेऊनच परत येणार,’ असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी केला आहे. 
धाराशिव, नाशिक, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमधून अनेक मराठा बांधव पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. बीडमधील अमळनेर गावातून आलेल्या शेतकऱ्यांशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. आता आरक्षण घेऊनच मागे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतातील कामे उरकली आहेत. जी काही थोडी कामे शिल्लक आहेत, त्यांची जबाबदारी घरातील महिलांवर सोपवल्याचे त्यांनी सांगितले. 

मंत्रालयासमोर बैलगाडीची खुंटी बांधणार 
पुणे : पेट्रोल लय महाग झालंय. आता वाहनाने मुंबईला जाणं शक्य नाही म्हणून आम्ही आमच्या बैलगाडीसोबत मुंबईकडे जातोय. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मंत्रालयाच्या समोरच बैलांची खुंटी बांधणार आणि शेणाच्या गोवऱ्या तिथल्या भिंतींवर थापणार,’ असा इशारा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे बैलगाडीतून निघालेल्या मराठा बांधवांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो लोकांनी बुधवारी पुण्यातून मुंबईकडे कूच केले. 

Web Title: Manoj Jarange-Patil's padayatra, which went to Mumbai for Maratha reservation, continued for 10 hours in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.