मॉन्सूनची कर्नाटकापर्यंत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 03:26 PM2018-05-30T15:26:41+5:302018-05-30T15:26:41+5:30
केरळनंतर अाता मान्सूनने कर्नाटकातील किनारपट्टी व अंतर्गत भागात प्रवेश केला अाहे. 6 जूनपासून महाराष्ट्र अाणि गाेव्यात माॅन्सूनचे अागमन हाेण्याची शक्यता अाहे.
पुणे : केरळमध्ये मंगळवारी आगमन केल्यानंतर मॉन्सूनने बुधवारी जोरदार वाटचाल करीत थेट कर्नाटकातील किनारपट्टी व अंतर्गत भागात प्रवेश केला आहे. ६ जूनपासून महाराष्ट्र आणि गोव्यात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मॉन्सूनची वाटचाल वेगाने होत आहे़ बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रातील मॉन्सूनच्या शाखेने अधिक वेगाने प्रगती करीत कर्नाटकाच्या अंतर्गत भागात प्रवेश केला आहे़ मॉन्सूनने बुधवारी कर्नाटकातील शिराली, हसन, म्हैसूर, कडोईकनॉल, तुतीकोरीन तसेच तामिळनाडुच्या काही भागात प्रवेश केला आहे़ येत्या ४८ तासात ईशान्यकडील राज्यात मॉन्सून प्रवेश करण्याची शक्यता आहे.
पुढील तीन दिवसात तामिळनाडु, आंध्रप्रदेश, तेलंगणा या भागात प्रवेश करण्याचा अंदाज असून तेथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात म्यानमार जवळ बुधवारी सकाळी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो ईशान्य भारताकडे येण्याची शक्यता आहे.