मनोरमा खेडकरांचा पिस्तूल परवाना रद्द! पोलीस आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस
By भाग्यश्री गिलडा | Published: July 14, 2024 04:40 PM2024-07-14T16:40:52+5:302024-07-14T16:41:13+5:30
पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केली होती
पुणे : प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी ग्रामीण पोेलिसांच्या पौड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मनोरमा खेडकर यांचा पिस्तुलाचा परवाना रद्द करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नोटीस बजावली आहे. यासोबतच खेडकर यांची अलिशान कार पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मनोरमा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. ’तुमचे कृत्य बेजबाबदारपणाचे आहे. तुमच्या कृत्यामुळे कुटुंबीय, तसेच समाजाला धोका निर्माण होऊ शकतो. तुम्ही शस्त्र परवान्यात दिलेल्या अटी आणि शर्तींचा भंग केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना रद्द करण्यात का येऊ नये ? ’अशी नोटीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बजावली आहे.
खेडकर कुटुंबियांचे अनेक कारनामे समोर
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह आता त्यांच्या कुटुंबाचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. चोर म्हणून पकडलेल्या नातेवाईकाला सोडविण्यासाठी खेडकर यांनी थेट नवी मुंबईच्या बड्या पोलीस अधिकाऱ्याला आयएएस पदाचा धाक दाखविल्याचा प्रकारही घडला होता. तसेच मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन हडपण्याशी संबंधित प्रकरणात शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत दमदाटी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या शेतकऱ्यांनी याविरोधात पौड पोलीस ठाण्यात तक्रारही देण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, वरून फोन आल्याने पोलिसांनी ही तक्रार नोंदविली नाही, असा आरोप या शेतकऱ्यांनी केला होता. आता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.