मनुष्यबळाची कमतरता, बसची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:24 AM2018-06-19T01:24:20+5:302018-06-19T01:24:20+5:30
पीएमपीच्या सर्व गाड्या सीएनजी झाल्या; परंतु देखभाल- दुरुस्तीबाबत तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारीच नसल्याने बसची दुरवस्था झाल्याचे पीएमपी अधिकारी आणि प्रवाशांच्या चर्चेमध्ये दिसून आले.
पुणे : पीएमपीच्या सर्व गाड्या सीएनजी झाल्या; परंतु देखभाल- दुरुस्तीबाबत तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारीच नसल्याने बसची दुरवस्था झाल्याचे पीएमपी अधिकारी आणि प्रवाशांच्या चर्चेमध्ये दिसून आले.
पीएमपी प्रवासी मंचातर्फे आयोजित मिडी बसेस नवीन-त्रुटी अनेक व डिजिटल व्यवस्थेवरील चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पीएमपीचे मुख्य अभियंता शिवाजी जाधव, आयटी प्रमुख शिरीष कालेकर, केपीआयटीचे मिडी बस आयटीएमएस तज्ज्ञ मधुकर माने, मंचचे अध्यक्ष जुगल राठी, सतीश चितळे, अॅड. शीला परळीकर आदी उपस्थित होते. सजग सक्रिय प्रवासी म्हणून वैभव कुलकर्णी, सु. वा. फडके, रुपेश केसेकर, जयदीप साठे, उद्धव गार्डी, निळकंठ मांढरे, सतीश सुतार, विराज देवधर यांचा मोफत बस पास देऊन गौरव करण्यात आला. प्रवाशांनी विविध गंभीर विषयासंबंधी तक्रारी मांडल्या.
मागील वर्षी ठेकेदारांचा संप झाला, त्या वेळी स्वत:च्या २०० बस पीएमपीने ठेकेदाराकडून परत ताब्यात घेतल्या. त्यापैकी १०० बस पिंपरी-चिंचवड येथे आणि १०० बस कोथरूड येथे ठेवण्यात आल्या. मात्र, डेपोमध्ये बस उभ्या करण्याकरितादेखील जागा उपलब्ध नव्हती. त्या बसबाबतच्या विविध समस्यांना आजही प्रशासन सामोरे जात आहे. सर्व गाड्या सीएनजी असून त्याबद्दलचे ज्ञान असणारी केवळ ५-५० माणसेच पीएमपीकडे आहेत. तर, मिडी बसबाबतचे इतर तांत्रिक ज्ञान असलेले मनुष्यबळदेखील बोटावर मोजण्याइतके आहे. त्यामुळे पीएमपीच्या बसची परिस्थिती सुधारून त्यांची योग्य देखभाल व्हावी, याकरिता गुणवत्तेवर तांत्रिक मनुष्यबळाची पीएमपीमध्ये पारखून भरती करायला हवी, असा सूर पीएमपी अधिकारी आणि प्रवाशांच्या चर्चेमध्ये उमटला.
शिवाजी जाधव म्हणाले, चांगल्या बस रस्त्यावर येण्याकरिता चांगले तांत्रिक मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. त्याकरिता पीएमपीमध्ये होणारी मनुष्यभरती गुणवत्तेनुसार पारखून व्हायला हवी. इतर ठिकाणी चांगले पगार मिळाल्यानंतर इथे असलेल्या कमी पगारामुळे चांगले अधिकारी व कामगार दुसरीकडे जातात. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
जुगल राठी म्हणाले, बसेसबाबत जे काम बाहेरील संस्था वा ठेकेदारांना दिले आहे, त्यांनी ते काम वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई व्हायला हवी. जर, पुन्हा तक्रारी आल्या, तर ठेकेदाराचा ठेका त्वरित रद्द करण्यात यावा. डिजिटल बससुविधेमुळे पीएमपीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असला, तरी त्याप्रकारची उत्तम सुविधा अजूनही मिळत नाही, असेही ते म्हणाले.
>जून अखेरपर्यंत मिडी बसेसच्या तांत्रिक अडचणी दूर करू : शिरीष कालेकर
पीएमपीच्या ताफ्यात २०० मिडी बसेस आहेत. त्यात काही तांत्रिक अडचणी असल्याची बाब खरी आहे. पीएमपीसह मिडी बसेसबाबतच्या कामाशी संलग्न असलेल्या अनेक संस्था आहेत. त्यामुळे त्या सर्वांमध्ये समन्वय साधून जून अखेरपर्यंत सर्व मिडी बसेसमधील डिस्प्ले, लाईट्स, स्पिकर, फलक, माईक, जीपीएस यांसारख्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करू, असे आश्वासन पीएमपीचे आयटीप्रमुख शिरीष कालेकर यांनी दिले.
200मागील वर्षी ठेकेदारांचा संप झाला, त्या वेळी स्वत:च्या २०० बस पीएमपीने ठेकेदाराकडून परत ताब्यात घेतल्या. त्यापैकी १०० बस पिंपरी-चिंचवड येथे आणि १०० बस कोथरूड येथे ठेवण्यात आल्या.