SPPU | पुणे विद्यापीठातील प्लेसमेंट सेलला मनुष्यबळाची वानवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 09:50 AM2023-01-06T09:50:33+5:302023-01-06T09:50:43+5:30
थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध ५७ विभागात हजाराे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांकडून मागणी असते, तसेच सेलच्या माध्यमातून अनेकांना नाेकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, प्लेसमेंट सेलमधील समन्वय अधिकारी नाेकरी साेडून जात असून सध्या केवळ एका कर्मचाऱ्यावर प्लेसमेंट सेलचे कामकाज सुरू आहे.
सेलमध्ये चार पूर्णवेळ अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज असून विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ मनुष्यबळाची नेमणूक करावी, अशी मागणी युवक क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात गुरुवारी कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी युक्रांदच्या वतीने पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, कुशल चव्हाण, मयूर शिंदे उपस्थित हाेते.
एकच कर्मचारी कार्यरत
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्लेसमेंट सेलमध्ये चार पूर्णवेळ अधिकारी आणि कर्मचारी मनुष्यबळाची गरज असताना, सध्या कामकाज फक्त एकच कर्मचारी पाहत आहे, मात्र तेथे आहे. वेळेवर पगार न हाेणे यासह विविध कारणांमुळे एक महिन्यापूर्वी प्लेसमेंट सेलमधील समन्वय अधिकाऱ्यांने काम सोडले, त्यानंतर आठ दिवसांपूर्वी आणखी एक अधिकारी काम साेडून गेला आहे. त्यामुळे सध्या एकाच कर्मचाऱ्यावर सेलचा कारभार सुरू आहे.
थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर
विद्यापीठ कॅम्पसमधील विभागातील विद्यार्थ्यांना नाेकरीसाठी अनेक कंपन्यांकडून मागणी आहे, परंतु प्लेसमेंट सेलला सक्षम समन्वय अधिकारी नाही. त्यामुळे प्लेसमेंट सेल व विद्यापीठातील विभाग आणि कंपनीमध्ये समन्वय साधण्यास अडचणी येत आहेत. यासह विभागप्रमुखही याबाबत सकारात्मक दिसून येत नाहीत. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत आहे, असे युक्रांदच्या वतीने सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना नाेकरीची नितांत गरज असताना विद्यापीठाचा प्लेसमेंट सेल फक्त नावालाच उरलेला आहे. विविध कंपन्यांशी समन्वय साधत विद्यार्थ्यांना नाेकरीच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ प्लेसमेंट सेलमध्ये कायमस्वरूपी मनुष्यबळाची नियुक्ती करावी.
- सचिन पांडुळे, शहराध्यक्ष, युक्रांद