हवेली प्रशासनाने ऑक्सिजन प्रकल्प घेतला ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:27+5:302021-04-24T04:10:27+5:30
लोणी काळभोर : कोरोनाच्या महामारीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील खासगी ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प हवेली तालुका ...
लोणी काळभोर : कोरोनाच्या महामारीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील खासगी ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प हवेली तालुका प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. यामुळे हवेली तालुक्यातील सर्व रुग्णालयांना सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला असून, ही बाब हॉस्पिटल व रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत आहे.पाच दिवसांपूर्वी दौंड व हवेली तालुका प्रशासन यांचेमध्ये यवत येथील गुरुदत्त एटंरप्रायझेस या ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पावरुन तू तू... मैं मैं.. झाली होती. शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळीच हस्तक्षेप केल्याने दौंड व हवेली तालुक्यातील रुग्णालयांसाठी समन्वयाने ऑक्सिजन वाटपाचा निर्णय घेतला आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी प्रवीण साळुंखे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर,अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे व महसूल पथकाने नुकतेच कदमवाकवस्ती येथील पुणे एअर प्रॉडक्ट हा ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना ताब्यात घेतला आहे. यावेळी महसूल नायब तहसीलदार संजय भोसले, हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरुमुल्ला, तलाठी दादासाहेब झंजे,राजेश दिवटे उपस्थित होते. या प्रकल्पाची दैनंदिन क्षमता ११ मेट्रिक टन आहे. या प्रकल्पामुळे हवेली व पुणे जिल्ह्यातील इतर भागांतील रुग्णालयांना आवश्यक तो ऑक्सिजन पुरवठा होणार असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
विजयकुमार चोबे, अप्पर तहसीलदार हवेली :- यवत (ता.दौंड) येथील गुरुदत्त एंटरप्रायझेस या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून दौंड व हवेलीतील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा होत आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी प्रवीण सांळुखे व प्रांताधिकारी सचिन बारवकर यांचे सूचनेनुसार कदमवाकवस्ती (ता.हवेली) येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून सध्यस्थितीत दैनंदिनी ६ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होत असल्याने हवेलीमधील हॉस्पिटलच्या मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठा होत असून शिल्लक असलेला साठा इतर तालुक्यातील रुग्णालयांना पुरवणार आहे. हे काम महसूलच्या समन्वय समिती मार्फत सुरू आहे.
कदमवाकवस्ती (ता.हवेली) येथील ऑक्सिजन निर्मिती करणा-या प्रकल्पाची माहिती घेताना महसूल अधिकारी.