सरकार, विज्ञान व उद्योग एकत्र आल्यास काेराेनाची साथ राेखणे शक्य : मनसुख मांडवीय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 01:10 PM2022-10-21T13:10:24+5:302022-10-21T13:12:16+5:30
जगातील अद्ययावत तंत्रज्ञान देशात आणून त्याचा वापर वाढला पाहिजे...
पुणे : काेराेनाच्या वाढत्या संसर्गानंतर जगभरातील वैज्ञानिक एकवटले आणि त्यांनी लस तयार केली. भारतात तर आतापर्यंत ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सरकार, विज्ञान व उद्याेग एकत्र आल्यास साथीला राेखणे शक्य आहे. जगातील अद्ययावत तंत्रज्ञान देशात आणून त्याचा वापर वाढला पाहिजे. परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण लस निर्मितीमध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी उपस्थित शास्त्रज्ञांसह कंपन्यांना केले.
विकसनशील देशांमधील लस उत्पादकांच्या नेटवर्कच्या (डीसीव्हीएमएन) तेवीसाव्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते पुण्यात बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला, लस उत्पादक कंपन्यांच्या नेटवर्कचे चेअरमन साई डी. प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी राजिंदर सुरी तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन उपस्थित होते.
लसीकरणात आणखी चांगले काम करण्यासाठी चार गोष्टींवर काम करणे आवश्यक आहे. त्यातील पहिली गोष्ट ज्ञान आहे. भारतातील संशोधक विद्यालयांनी अन्य विकसित देशातील संशोधन संस्थांबरोबर करार करायला हवा. भारतात लसींच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून शोध आणि विकासाकडे अधिक लक्ष दिले जावे. दुसरी गोष्ट "टेक्नॉलॉजी' म्हणजेच तंत्रज्ञान ट्रान्स्फर करण्यावर लक्ष द्यायचे आहे. औषध क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या एकत्रित आल्या पाहिजे. काेरोनासारख्या आजारावर मात करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. मांडवीय यांनी नमूद केले.
साथीच्या काळात आम्ही केलेल्या चुका टाळून भविष्यात येणाऱ्या साथींना रोखण्यासाठी सक्षम आणि प्रभावी धोरणात्मक आराखडा तयार करा. जेणेकरून साथीला तोंड देणे शक्य होईल, अशी सूचना लस विकसित करण्यासाठी चतुःसूत्रीचे पालन करण्याची आवश्यकता असल्याकडे मांडवीय यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.