धक्कादायक! YCM रुग्णालयात मंत्राने रुग्णावर उपचार; सुरक्षारक्षक नावालाच, अंधश्रद्धेला खतपाणी
By प्रकाश गायकर | Updated: August 18, 2023 15:46 IST2023-08-18T15:45:41+5:302023-08-18T15:46:32+5:30
पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या शहरामध्येच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे...

धक्कादायक! YCM रुग्णालयात मंत्राने रुग्णावर उपचार; सुरक्षारक्षक नावालाच, अंधश्रद्धेला खतपाणी
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जात आहे. असे असताना शहरातील महापालिका रुग्णालयामध्ये तंत्र-मंत्राने रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.१८) सकाळी समोर आला आहे. सुरक्षारक्षक, पोलिस तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्दळ असतानाही खुलेआम रुग्णालयात जादूटोणा व मंत्रोच्चार करत एक व्यक्ती रुग्णावर उपचार करत असल्याचे भासवत होता. यामुळे पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या शहरामध्येच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संत तुकारामनगर येथे महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय आहे. साडेसातशे बेडच्या या रुग्णालयामध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून रुग्णांची गर्दी असते. पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल मेट्रो सिटीकडे सुरू आहे. तसेच पुरोगामी शहर व विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराचे जुळे शहर म्हणून शहराची ओळख आहे. असे असताना पालिका रुग्णालयामध्ये खुलेआम तंत्र-मंत्राद्वारे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या माध्यमातून अनेक गोर-गरीब रुग्णांना लुबाडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रुग्णालयामध्ये एका रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवत एक व्यक्ती मंत्र उच्चारत असल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयामध्ये सुरक्षारक्षक, डॉक्टर व कर्मचारी असताना या चुकीच्या प्रकाराला रोखण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. त्यामुळे हा प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरू असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रात व स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील रुग्णालयात अशा पद्धतीने अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अंधश्रध्देला खतपाणी घालण्यात येत आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना देखील या कायद्याला न जुमानता शासकीय रुग्णालयात अंधश्रद्धा पसरवण्याचे व गरीब रुग्णांना लुटण्याचे काम खुलेआम चालू आहे. याची सखोल चौकशी करून या व्यक्तीवर व त्याला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनावर अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याअंतर्गत कारवाई करावी.
- संतोष शिंदे, प्रदेश महासचिव, रयत विद्यार्थी विचार मंच
रुग्णालयामध्ये येणारी व्यक्ती ओपीडीसाठी येत आहे की तंत्रमंत्र करण्यासाठी येत आहे, हे ओळखणे अवघड आहे. मात्र, सीसीटीव्ही तपासून संबंधित व्यक्तीवर कारवाईसाठी प्रयत्न करू. तसेच सुरक्षारक्षकांना यापुढे अलर्ट राहण्याच्या सूचना देतो.
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.