मनु संत ज्ञानेश्वर अाणि तुकारामांपेक्षा श्रेष्ठ ; संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 02:34 PM2018-07-08T14:34:47+5:302018-07-08T14:36:35+5:30
मनु हा संत ज्ञानेश्वर अाणि संत तुकाराम महाराजांपेक्षा श्रेष्ठ हाेता, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले अाहे.
पुणे : गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजाराे अनुयायांना अापल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा श्रेष्ठ हाेता असे वादग्रस्त वक्तव्य पुन्हा एकदा संभाजी भिडे यांनी केले अाहे.
संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराजांच्या पालखी साेहळ्यामध्ये दाखल हाेण्यासाठी संभाजी भिडे काल (शनिवारी) पुण्यात दाखल झाले हाेते. त्यावेळी दुपारी त्यांनी अापल्या धारकऱ्यांना जंगली महाराज मंदिरात संबाेधित केले, त्यावेळी ते बाेलत हाेते. ज्यांचा हिंदुत्वावर विश्वास आहे.त्या सर्वांनी गावागावात सभा संमेलन घ्यावे. देशाला वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे. ‘वैदिक हिंदू धर्म हा अनुभव सिद्ध असून मनाला जिंकून घेण्याची प्रक्रिया म्हणजे धर्माचार होय. धर्म हा आचरणातून बळकट होतो. त्याला अधिक बळकटी देण्यासाठी संघटनांची गरज असून सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र यायला हवे,’ असे भिडे यावेळी म्हणाले तसेच बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय पण ते वढू रायगडाला मान्य नाही असेही ते यावेळी म्हणाले.
गेल्या वर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी नंग्या तलवारी घेऊन पालखी साेहळ्यात सहभागी झाले हाेते, त्यामुळे माेठा वाद निर्माण झाला हाेता. यंदा पाेलीसांनी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना नाेटीस बजावली हाेती. परंतु भिडे व धारकरी हे वारीत सहभागी हाेण्यावर ठाम हाेते. संचेती चाैकात बॅंक अाॅफ महाराष्ट्रच्या समाेर पाेलीसांनी बॅरिगेट लावून धारकऱ्यांना अडवून धरले. पालखी गेल्यानंतर धारकरी मागून चालत जातील असे नंतर ठरविण्यात अाले. दरम्यान संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच तुकाराम महाराजांच्या पालखीचे सारथ्यही केले. पालखी गेल्यानंतर धारकऱ्यांनी संचेती चाैक ते संभाजी पुतळ्यापर्यंत फेरी सुद्धा काढली.