कुरकुंभ ड्रग्ज प्रकरण: खोकल्याच्या औषधाच्या नावाखाली एमडीचे उत्पादन; आरोपी भुजबळची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 09:58 AM2024-02-29T09:58:01+5:302024-02-29T09:58:17+5:30
या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना पोलिसांनी अटक केली असून, पश्चिम बंगाल येथून सुनील वीरेंदनाथ बर्मन याला अटक करण्यात आली असून, त्याला ट्रान्झिंस्ट रिमांडद्वारे पुण्यात आणले जात आहे....
पुणे :पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंभ येथील अर्थकेम लॅबोरेटरीमध्ये कारवाई करत मोठ्या प्रमाणात ‘रेडी टू इट’ प्रकारातील कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला. या प्रकरणात केमिकल इंजिनिअर असलेला युवराज भुजबळ हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्या चौकशीदरम्यान याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थकेम या कंपनीत खोकल्याचे औषध बनवण्यासाठी लागणाऱ्या कंटेंटच्या नावाखाली एमडीचे उत्पादन सुरू होते. या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना पोलिसांनी अटक केली असून, पश्चिम बंगाल येथून सुनील वीरेंदनाथ बर्मन याला अटक करण्यात आली असून, त्याला ट्रान्झिंस्ट रिमांडद्वारे पुण्यात आणले जात आहे.
या प्रकरणातील तपासादरम्यान विश्रांतवाडी येथील गोदामाव्यतिरिक्त लोहगाव येथील गोदाम पोलिसांनी शोधून काढले होते. हे गोदाम थॉमस नावाच्या व्यक्तीच्या मालकीचे आहे. त्याने ते अशोक मंडलमार्फत सुनील बर्मन याला भाडेतत्त्वावर दिले होते. या गोदामाची पाहणी केल्यानंतर या गोदामात मोठ्या प्रमाणावर पोलिसांना ड्रम आढळून आले. त्यातील एका ड्रममध्ये एमडी साठवून ठेवल्याचा व त्याची पुढे डिलिव्हरी दिल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. या गोदामाची जबाबदारी ही सुनील बर्मन आणि अशोक मंडल या दोघांवर होती. या गोदामात आढळून आलेले ड्रम हे कुरकुंभ येथील अर्थकेम कारखान्यात आढळून आलेल्या ड्रम प्रमाणेच असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
कुरकुंभ येथील कारखान्यातूनच लोहगाव येथील गोदामात एमडी आल्याचे व येथून पुढील ठिकाणापर्यंत पोहोचवले गेले असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सुनील बर्मनला पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे. तसेच, पोलिस तपासात कुरकुंभ येथील कंपनीत बनवलेले एमडी हे दिल्ली येथून पुढे लंडनलादेखील निर्यात झाल्याचे तपासात पुढे आले आहे.
सुमारे १४० किलो एमडी लंडनला
पुण्यातून दिल्ली येथे एमडीची तस्करी झाल्यानंतर विमानाद्वारे आंतराष्ट्रीय पॅकिंग प्रमाणे ते पॅकिंग करून ते पुढे लंडनला पाठवले जात असल्याची बाब तपासात समोर आली आहे. प्राथमिक तपासात १४० किलो एमडीची तस्करी झाल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. परंतु, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून या सर्व मालाची मोजदाद सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.