ऑक्सिजन तयार करणाऱ्या यंत्राची वालचंदनगरमध्ये निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:25+5:302021-09-08T04:16:25+5:30
डीआरडीओ शास्त्रज्ञांच्या सहकार्याने वालचंदनगर उद्योग समूहाच्या माध्यमातून १० वैद्यकीय ऑक्सिजन संयंत्राची निर्मिती करीत असून, पाचव्या सहाव्या आणि सातव्या ...
डीआरडीओ शास्त्रज्ञांच्या सहकार्याने वालचंदनगर उद्योग समूहाच्या माध्यमातून १० वैद्यकीय ऑक्सिजन संयंत्राची निर्मिती करीत असून, पाचव्या सहाव्या आणि सातव्या वैद्यकीय प्राणवायू यंत्राच्या माध्यमातून २५० एलपीएम (म्हणजेच प्रतिमिनिट अडीचशे लिटर) ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. यामुळे देशातील लाखो रुग्णांचे जीव वाचणार आहेत. देशाच्या उत्तर पूर्व राज्यातील नागालँड, झारखंड, त्रिपुरा आणि राजस्थानला वैद्यकीय ऑक्सिजन संयंत्र रवाना करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री सहायता निधीतून यशस्वी उपक्रम राबवण्यात आलेला आहे.
मंगळवारी सकाळी दहा वाजता वैद्यकीय प्राणवायू यंत्राच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून त्या गाड्या विविध राज्यांकडे पाठविण्यात आल्या. मेडिकल ऑक्सिजन संयंत्राचे डिझाइन डीआरडीओने विकसित केले. मेडिकल ऑक्सिजन यंत्र निर्मितीसाठी इंजिनिअर आणि कामगार वर्ग यांनी १६ ते १८ तास काम करीत हा प्रकल्प उभा केला. या कामात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या इंजिनीअर अंगद शर्मा, एकनाथ पेठे आणि चंद्रा शेट्टी यांचा वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी व्हर्चुअलच्या माध्यमातून डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉक्टर टी. एम. कोत्रेश, वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग शेठ दोशी, संचालक पी एम कुरुलकर, डी बी पेद्राम, नितीन पोळ फॅक्टरी मॅनेजर व्ही पी शुक्ला, मनुष्यबळ विकास अधिकारी धीरज केसकर, चीफ फायनान्शियल ऑफिसर संदीप जैन, कामगार नेते प्रवीण बल्लाळ, नंदकुमार गोंडगे यांसह वालचंदनगर कंपनीतील पदाधिकारी व कामगारवर्ग उपस्थित होते.
—
फोटो क्रमांक
फोटो ओळी : भारतीय संरक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंद उद्योग समूहाच्या माध्यमातून वैद्यकीय प्राणवायू निर्मिती करणाऱ्या संयंत्रांना हिरवा झेंडा दाखवून गाड्या रवाना करण्यात आल्या.